एनडीआरएफच्या धर्तीवर आता ‘ठाणे आपत्ती प्रतिसाद दल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 05:19 AM2017-12-09T05:19:03+5:302017-12-09T05:19:10+5:30

पावसाळ्याच्या काळात किंवा एखादी इमारत दुर्घटना घडली तर, वारंवार एनडीआरएफला पाचारण करावे लागते. मात्र, त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर लागतो.

'Thane Disaster Response Force' on the lines of NDRF | एनडीआरएफच्या धर्तीवर आता ‘ठाणे आपत्ती प्रतिसाद दल’

एनडीआरएफच्या धर्तीवर आता ‘ठाणे आपत्ती प्रतिसाद दल’

googlenewsNext

ठाणे : पावसाळ्याच्या काळात किंवा एखादी इमारत दुर्घटना घडली तर, वारंवार एनडीआरएफला पाचारण करावे लागते. मात्र, त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर लागतो. त्यामुळे आता एनडीआरएफच्याच धर्तीवर स्वत:चे ‘ठाणे आपत्ती प्रतिसाद दल’ स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला. या टीममध्ये ५० जणांचा चमू असणार आहे.
पावसाळ्यातील आपत्ती किंवा इमारत दुर्घटना असो, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी मे २०१४ मध्ये मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा आणि आजूबाजूच्या भागासाठी एनडीआरएफच्या टीम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि कोकण विभागीय आयुक्तांवर सोपवण्यात आली होती.
यामध्ये या टीमच्या राहण्याची व्यवस्था, त्यांचे खानपान, यंत्रसामग्री ठेवण्यासाठी जागा आदींसह इतर महत्त्वाच्या बाबींचा अंतर्भाव होता. परंतु, त्याला तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप ठाण्यात ही टीम कायमस्वरूपी प्राप्त झालेली नाही. दरम्यान, पालिकेने या टीमसाठी ठाण्यात जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, आता एनडीआरएफच्या धर्तीवरच ठाण्यात टीडीआरएफ (ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी झालेल्या अधिकारी परिषदेच्या पहिल्या दिवशी घेतला. महसूल विभागाच्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून महापालिका क्षेत्रात प्रथमच सुरू केलेल्या महापलिका अधिकारी परिषदेची सुरुवात शुक्रवारी झाली. नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे ही परिषद दोन दिवस चालणार असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तिचे अनौपचारिक उद्घाटन केले.
दरम्यान, या टीडीआरएफमध्ये उपायुक्त, आपत्कालीन व्यवस्थापन, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि माहिती व जनसंपर्कअधिकारी महेश राजदेरकर यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली असून या समितीने टीडीआरएफची रचना कशी असेल, किती मनुष्यबळ असावे, काय यंत्रसामग्री असावी, याविषयीचा मसुदा एक आठवड्यात सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
विभागीय आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अधिक समृद्ध करणे, या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा निर्माण करणे, प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणे आदी गोष्टींचा टीडीआरएफसाठी प्रामुख्याने विचार करण्यात येणार असून निवृत्त लष्करी अधिकारी यांची या कक्षासाठी नियुक्ती करण्याची प्रक्रि या सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रशिक्षित उमेदवारांमध्ये आर्मी किंवा पोलीस दलातील प्रतीक्षायादीवरील पात्र उमेदवारांचा यासाठी विचार करता येईल का, याचा निर्णय घेण्यात येईल. शहरात कुठेही आपत्कालीन घटना घडल्यास मदतकार्यासाठी या प्रशिक्षित आणि अत्याधुनिक यंत्रणांनी युक्त कक्षाचा निश्चित उपयोग होणार असल्याचेही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: 'Thane Disaster Response Force' on the lines of NDRF

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.