ठाणे ते दिवा रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूचे रूपडे पालटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 04:34 PM2017-12-12T16:34:54+5:302017-12-12T16:35:22+5:30
ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र.
ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र. पण हे चित्र आता बदलणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा चक्क रेल्वेने प्रवास करून रेल्वेच्या दुतर्फा असलेला कचरा साफ करून तिथे रंगरंगोटी आणि पेंट दि वॉल मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशा पद्धतीने राबविण्यात येणारा भारतातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
आज दुपारी दीडच्या सुमारास जयस्वाल यांनी महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, मुंबईच्या प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर रुबल नागी, प्रसिद्ध चित्रकार किशोर नादावडेकर, वास्तुविशारद प्रवीण जाधव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लोकल ठाण्यात पकडून दिवा स्थानकापर्यंत प्रवास केला.
या लोकल प्रवासात त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पडलेला कचरा साफ करणे, झोपडपट्टयाच्या बाजूला पडलेला कचरा उचलणे, तिथे रंगरंगोटी करणे, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत त्या ठिकाणी पेंट दी सिटी वॉल या मोहिमेच्या धर्तीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे.
यावेळी बोलताना जयस्वाल म्हणाले की, इंडोनेशियामधील कँगपूंग पीलंग, पोलंडमध्ये झलिपी, स्पेनमध्ये जुझकार, ब्राझिलमध्ये रियो आणि मेक्सिकोमधील पचुकास लास पल्मितास या गावांची संपूर्ण रंगरंगोटी करून त्या गावांना आकर्षक बनविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पेंट दि सिटी वॉल या मोहिमेच्या दुस-या टप्प्यात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. जेणेकरून ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा प्रवास करणा-या प्रवाशांना प्रसन्नता वाटेल. याच धर्तीवर रूपादेवी पाड्याचा विकास करणार असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
या महत्वाकांक्षी योजनेसाठी सर्वेक्षण करून संकल्पचित्र आणि कृती आराखडा एका महिन्यात तयार करून काम सुरू करणार असल्याचे सांगून जयस्वाल यांनी या नवीन मोहिमेमुळे ठाणे ते दिवा या रेल्वेच्या दोन्ही बाजूचे आजचे जे रूप आहे ते नक्कीच बदलेल, अशी आशा व्यक्त केली.