ठाण्यात दोन महिन्यात डेंग्युच्या रुग्णात झाली दुपटीने वाढ, स्वाइनचे आढळले चार रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 05:58 PM2018-09-26T17:58:15+5:302018-09-26T18:00:07+5:30
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्युच्या रुग्णात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्वाइनचे चार रुग्ण आढळले असून यामध्ये सुदैवाने अद्याप कोणाचाही मृत्यु झालेला नाही.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत साथरोग आटोक्यात आणण्यासाठी विविध स्वरुपाचे प्रयत्न केले जात असतांनाच मागील दोन महिन्यात डेंग्युच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात शहरात डेंग्युचे तब्बल २०९ संशयीत रुग्ण आढळले असून पैकी ६९ रुग्णांना डेंग्युची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर याच कालावधीत शहरात स्वाईनचे चार रुग्ण आढळले आहेत. तर मलेरीयाच्या रुग्णातसुध्दा वाढ झाली असून या कालावधीत १५२ रुग्ण आढळले आहेत. तर चिकनगुणीयाचा एक रुग्ण आढळला आहे.
वारंवार बदलत असलेल्या हवामानामुळे साथ रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या काळात आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मागील वर्षी मलेरीयाचे जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १३०० हून अधिक रुग्ण आढळले होते. तर यंदा याच कालावधीत ५६० रुग्ण आढळले आहेत. तर जुलैमध्ये १४१, आॅगस्ट १२२ आणि २४ सप्टेंबरपर्यंत ३० रुग्ण आढळले आहेत. तर डेंग्युचे मागील वर्षी याच कालावधीत १६४ रुग्ण आढळले होते. यंदा ही संख्या दुपटीने वाढली आहे. यंदा २४ सप्टेंबर पर्यंत डेंग्युचे ४२९ रुग्ण संशयीत आढळले असून ९४ जणांना डेंग्युची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जुलै महिन्यात १०५, आॅगस्टमध्ये १४९ आणि सप्टेंबरमध्ये ६० जण हे संशयीत रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे साथरोग आटोक्यात असल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा अखेर फोल ठरू लागला आहे. परंतु दुसरीकडे मागील वर्षी हत्तीरोगाचे ११ तर यंदा याच कालावधीत ५ रुग्ण आढळले असून स्वाईन फ्ल्युच्या रुग्णात वाढ होऊन आॅगस्ट मध्ये १ आणि सप्टेंबरमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय डायरीयाचे जानेवारी ते २४ सप्टेंबर २०१८ या कालावधीत १३४०, काविळचे १४, टायफाईडचे ५०, लेप्टोचे ०४, डिसेन्ट्रीचे १७७ आणि चिकनगुणियाचा एक रुग्ण आढळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणाचाही मृत्यु झालेला नाही.