ठाण्यात चक्क स्मशानभूमीचीच झाली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 02:03 AM2018-04-19T02:03:21+5:302018-04-19T02:03:21+5:30
ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती.
ठाणे : शहरात पूर्वी अस्तित्वात असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. या स्मशानभूमीच्या जागेवर इमारती उभारण्यास परवानगी कशी काय देण्यात आली, याची चौकशी करून चोरीला गेलेल्या स्मशानभूमींचा शोध महापालिकेने घ्यावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.
ओवळा-माजिवडा मतदारसंघात पूर्वी ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या काळात नागरी वस्ती कमी असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात स्मशानभूमीची आवश्यकता भासत नव्हती. त्यामुळे लक्ष्मी चिरागनगर परिसरातील नागरिक हे शेठ ग्रुपच्या सद्य:स्थितीत उभ्या असलेल्या वसंत लॉन्स गृहसंकुलाच्या नाल्याशेजारील जागेत अंत्यसंस्कार करत होते. वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर परिसरातील नागरिक सध्या रस्ता नसलेल्या रामबाग व जुन्या कोंजेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत होते. उपवन व पोखरण रोड नं. २ परिसरातील नागरिक हे आता उभ्या असलेल्या नीळकंठ गृहसंकुल परिसराच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. त्याचबरोबर लोकमान्यनगर परिसरातील नागरिक हे यशोधननगर, देवेंद्र इंडस्ट्रीजसमोरील नाल्यालगत उभ्या असलेल्या इमारतींच्या जागेत अंत्यसंस्कार करत होते. जुना कोकणीपाडा व वसंत विहार परिसरातील नागरिक हे कल्पतरू व नीळकंठ गृहसंकुलांच्या परिसरातील जागेत अंत्यसंस्कार करत होते, असे सरनाईक यांनी सांगितले. येऊर, पाटोणापाडा परिसरातील नागरिक हे खाजगी जागेवर आजही उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत, तर पानखंडा गावात स्मशानभूमी वनखात्याच्या जागेत असल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत.
पालिकेने शोध घेण्याची केली मागणी
ओवळा येथील काही नागरिक ब्ल्यू रूफ क्लबशेजारील दिलीप ओवळेकर यांनी बांधलेल्या जागेत अंत्यसंस्कार करत आहेत. भार्इंदरपाडा व आसपासचे नागरिक नागलाबंदरशेजारील मेरीटाइम बोर्डाच्या जागेवर उघड्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. एकूणच ठाणे शहरात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असल्याने या भागातील स्मशानभूमी चोरीला गेल्या की काय, असा प्रश्न त्यांनी केला असून गायब झालेल्या व चोरीला गेलेल्या स्मशानभूमीचा महापालिकेने शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.