उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 06:03 AM2024-04-27T06:03:40+5:302024-04-27T06:04:23+5:30

प्रचाराला फारच थोडा कालावधी मिळण्याची भीती

Thane Lok Sabha Constituency - No candidate has been decided yet from the Mahayuti | उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?

उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?

ठाणे : ठाणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धुरळा उडताना दिसत असल्याने महायुतीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, असे काकुळतीला येत ते नेत्यांना विनंती करू लागले आहेत. महायुतीचा उमेदवार २ मे रोजी जाहीर होणार असल्याचे सांगितले जाते. उमेदवार जाहीर करण्यास जेवढा उशीर होईल, तेवढे प्रचाराला कमी दिवस मिळतील, असे कार्यकर्ते म्हणत आहेत.

महायुतीमधील शिंदेसेना, भाजप या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आता सर्वसामान्य ठाणेकर तुमचा उमेदवार कधी ठरणार?, असे विचारू लागले आहेत. आपला उमेदवार कोण हे पक्षाच्या आमदारांना, जिल्हाध्यक्षांना, प्रवक्त्यांना विचारले तरी ते खांदे उडवत आपल्याला माहिती नसल्याचे सांगतात. ठाण्यातून निवडणूक शिंदेसेना लढवणार की भाजप, उमेदवार भाजपचा असला तरी शिंदेसेनेच्या चिन्हावर लढणार का, उमेदवार भाजपचा व चिन्ह भाजपचे असे असले तर मतदारांमध्ये जाऊन काय सांगायचे हे व असे असंख्य प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात असून, त्याची उत्तरे त्यांच्याकडे नसल्याने आता लवकर सोक्षमोक्ष लावा, असे ते बोलू लागले आहेत. उमेदवारीबाबत केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सांगू शकतात, असे उत्तर ते देत आहेत.

ठाण्यातील उमेदवाराचे ठरत नसल्याने अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बारामतीत निघून गेलेत तर मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हातावर हात ठेवून बसून आहेत.

Web Title: Thane Lok Sabha Constituency - No candidate has been decided yet from the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.