ठाणे महापालिकेने स्वच्छता अॅपच्या ताज्या सर्व्हेत राज्यात मारली क्रमांक एकची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:45 PM2018-02-07T15:45:51+5:302018-02-07T15:51:08+5:30
स्वच्छता अॅपच्या ताज्या सर्व्हेत ठाणे महापालिकेने २७ व्या क्रमांकावरुन राज्यात थेट पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर देशात ठाणे महापालिका दुसऱ्या क्रमाकांवर आली आहे.
ठाणे - स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे महापालिकेला अद्याप स्वच्छता अॅपचे टारगेट पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु आता ताज्या सर्व्हेक्षणानुसार ठाणे महापालिकेने या अॅपच्या सर्व्हेक्षणात बाजी मारली असून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर देशात दुसऱ्या क्रमांकावर ठाणे महापालिका आली आहे. आजच्या घडीला ठाणे महापालिकेच्या या स्वच्छता अॅपवर ४७ हजार ५८७ नागरीकांनी प्रतिसाद दिला आहे. तर यातील १४ हजार ३२८ नागरीक हे त्यात अॅक्टीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. अॅक्टीव्ह असलेल्यांची संख्या कमी असली तरी देखील पालिकेने मात्र या अॅपच्या सर्व्हेत केवळ एका महिन्यातच २७ वरुन थेट राज्यात क्रमांक १ पर्यंतची तर देशात दुसऱ्या क्रमांकापर्यंतची आता येत्या काही दिवसात देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ असा विश्वास ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे.
स्वच्छता अॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला या अॅप बाबत ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याची माहिती डिसेंबरच्या अखेरीस समोर आली होती. डिसेंबर अखेर पर्यंत ४० हजार नागरीकांची नोंदणी अपेक्षित असतांना हे अॅप केवळ २४ हजार नागरीकांनीच डाऊनलोड केले होते. परंतु डिसेंबर अखेरची तारीख ३१ जानेवारी करण्यात आल्यानंतर या कालावधीत आतापर्यंत तब्बल ४७ हजार ५८७ नागरीकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. जर ४० हजार नागरिकांनी हा अॅप डाउनलोड केला तर १५० गुण ठाणे महापालिकेला मिळाणार आहेत. आता त्या पलीकडे महापालिकेने उडी घेतली आहे. जनाग्रह अॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यानुसार ०६ फेब्रुवारी पर्यंत हे अॅप डाऊनलोड करण्यांचा आकडा हा ४७ हजार ५८७ एवढा झाला असून या अॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या १४ हजार ३२८ एवढी आहे. तर ३३ हजार २५९ नागरीकांनी हा अॅप केवळ डाऊनलोड केला आहे. तर या अॅपवर आलेल्या २ लाख एक हजार ४०५ तक्रारींपैकी तब्बल १ लाख ९९ हजार ८३७ तक्रारींचे निवारण पालिकेने केले आहे. तर १ हजार ५१६ तक्रारी या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या अॅपमुळे ५६ हजार ७५८ नागरीकांपैकी ५५ हजार ६७६ नागरीकांनी पालिकेने केलेल्या कामाप्रती समाधान व्यक्त केले आहे. तर केवळ ७७२ नागरीकांनी असाधान व्यक्त केले आहे. समाधान व्यक्त करण्यांची टक्केवारी ही ९८.१ टक्के एवढी आहे.
पालिकेने केलेल्या या कामामुळेच २० डिसेंबर रोजी पालिका या अॅपच्या सर्व्हेत २७ व्या क्रमांकावर होती. आज तोच क्रमांक थेट राज्याच्या क्रमवारीत एकवर आला आहे. तर देशाच्या क्रमवारीत ठाणे महापालिका या अॅपमुळे क्रमांक दोनवर आली आहे. परंतु येत्या काही दिवसात आम्ही पहिल्या क्रमांकावर जाऊ असा विश्वासही पालिकेने व्यक्त केला आहे.
- तर या अॅपच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ग्रेटर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पूणे तिसऱ्या , पिंपरी चिंचवड चवथ्या वसई ६ व्या आणि कल्याण ७ व्या क्रमांकावर आणि नाशिक ८ व्या क्रमांकावर आहे.