ठाणे महापालिका उभारणार शौचालयांवर मोबाइल टॉवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:24 AM2018-10-19T00:24:58+5:302018-10-19T00:24:59+5:30
ठाणे : शहरात शौचालयांची उभारणी करूनही त्यांची निगा देखभाल राखली जात नसल्यामुळे पालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. ...
ठाणे : शहरात शौचालयांची उभारणी करूनही त्यांची निगा देखभाल राखली जात नसल्यामुळे पालिकेला नेहमीच टीकेचे धनी व्हावे लागत आहे. परंतु, आता केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाकरिता शहरातील शौचालयांवर मोबाइल टॉवर बसवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शौचालयांच्या दुरु स्तीचा खर्च वापर शुल्कातून केला तर महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संपूर्ण ३१३ गुण प्राप्त होऊ शकतात. मात्र, वापर शुल्क भरण्यास नागरिकांचा विरोध असल्यामुळे प्रशासनाने मोबाइल टॉवरची योजना आणली आहे.
शनिवारी होणाºया महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. महापालिका हद्दीत २०११ च्या जनगणनेनुसार ११८४३ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याचा अहवालप्राप्त झाला होता. त्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात ६९९८ कुटुंबे उघड्यावर शौचास जात असल्याची बाब पुढे आली होती. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी ८ हजारपेक्षा जास्त वैयक्तिक शौचालये प्रशासनाने बांधून दिली आहेत. परंतु, त्यांची देखभाल व्यवस्थित नसल्याने आणि नागरिकांकडूनही त्यांची काळजी घेतली जात नसल्याने पालिकेने हा निर्णय घेतला. यातून शौचालयांच्या दुरु स्ती व देखभालीवरील खर्च वापर शुल्कामधून वसूल करता येणे शक्य असून महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत संपूर्ण ३१३ गुण मिळू शकतात.