ठाणे महापालिकेच्या आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित, दिव्यात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:44 PM2018-04-04T17:44:13+5:302018-04-04T17:44:13+5:30
ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी आठ प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. केवळ दिवा प्रभाग समितीसाठी शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी सामना रंगणार आहे. असे असले तरी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीने पुन्हा आधीच्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे.
ठाणे - प्रभाग समिती अध्यक्षांना अतिशय कमी कार्यकाळ मिळाल्याने पुन्हा संधी मिळावी अशी मागणी मागील काही दिवसापासून जोर धरु लागली होती. त्यानुसार सर्वच पक्षांनी पुन्हा त्याच नगरसेवकांना प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी संधी दिल्याचे दिसून आले आहे. बुधवारी अर्ज भरण्याच्या दिवशी पाच प्रभाग समितीत शिवसेनेने तर प्रत्येकी एका प्रभाग समितीत राष्ट्रवादी आणि भाजपाने त्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर कळव्याला मात्र राष्ट्रवादीने आणि वागळेत शिवसेनेने नवा चेहरा दिला आहे. तर दिवा प्रभाग समितीसाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने त्याठिकाणी निवडणुक निश्चित मानली जात असून उर्वरीत ठिकाणची निवड ही बिनविरोध मानली जात आहे.
ठाणे महापालिकेत एक हाती सत्ता स्थापन केल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्या देखील निवडणुका रखडल्या होत्या. परंतु नऊ महिन्यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुका घेतल्या गेल्या. त्यानंतर अवघे पाच ते सहा महिनेच काम करण्याची संधी या प्रभाग समिती अध्यक्षांना मिळाल्याने पुन्हा आम्हाला संधी द्यावी अशी मागणी सर्वच पक्षातील प्रभाग अध्यक्षांनी केली होती. अखेर त्यांच्या मागणीचा विचार करुन पक्षाने देखील त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला असून त्यांना संधी देण्याचे निश्चित केले. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीत नंदा पाटील (भाजपा), वागळेत मात्र शिवसेनेने या खेपेला संध्या मोरे यांना संधी दिली आहे. माजिवडा मानपाडा सिधार्थ ओवळेकर, वर्तकनगर - रागीणी बैरीशेट्टी, लोकमान्य सावरकर नगर - कांचन चिंदरकर तर कळव्यात राष्ट्रवादीने महेश साळवींच्या जागी प्रकाश बर्डे यांना संधी दिली आहे. मुंब्य्रात मात्र अनिता किणे यांना पुन्हा संधी मिळाली आहे. नव्याने तयार झालेल्या दिवा प्रभाग समितीत शैलेश पाटील यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीने देखील अर्ज भरल्याने या प्रभाग समितीत निवडणुक निश्चित मानली जात आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या सुरमे नादीरा यासिन यांनी अर्ज भरला आहे.
दरम्यान मागील वेळेस नौपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनाला नऊ तर भाजपाला सात मते पडली होती. त्यामुळे भाजपाने आता या प्रभाग समितीत अर्ज भरला नाही. त्यानुसार येथे आता शिवसेनेच्या वतीने शर्मिला गायकवाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यानुसार आता शिवसेनेच्या वाटेला सहा प्रभाग समिती, राष्ट्रवादीच्या वाटेला दोन आणि भाजपाच्या वाटेला एक प्रभाग समिती आली आहे. एकूणच शिवसेनेचा पुन्हा प्रभाग समितीवर वरचष्मा दिसून आला आहे. तर राष्ट्रवादीने कळवा, मुंब्रा राखला आहे. परंतु दिव्यात होणारी लढत ही तशी नगण्य मानली जात आहे. याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जास्तीचे असल्याने ही समिती देखील शिवसेनेच्या वाटेला जाईल हे पक्क मानले जात आहे.