ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता, बीएलओच्या कामांमुळे शिक्षक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:33 PM2017-12-19T12:33:28+5:302017-12-19T12:34:58+5:30
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये ८० टक्के मुख्याध्यापकांची कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. तसेच अनेक शिक्षकांना बीएलओचे काम लावण्यात आल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.
ठाणे - एकीकडे २०१७-१८ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाने शाळांचा दर्जा उचांवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा दावा केला आहे. अत्याधुनिक शिक्षण पध्दती अंगीकारण्यासाठी देखील पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु असे असतांनाही तब्बल ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. त्यातही आता अनेक शिक्षकांना पुन्हा बीएलओच्या कामाला जुंपविण्यात आल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी पालिकेने विविध स्वरुपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाने, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतांनाच, इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करणे, ई लर्निंग आदींसह विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु असे असले तरी मागील पाच वर्षापासून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले मुख्याध्यापकच नसल्याने, विद्यार्थ्यांचे भवितव्य काहीसे अंधातरी आल्याचे दिसत आहे. या संदर्भात काही शिक्षक संघटनांना पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतर जुन्या शिक्षकांच्या हाती सेवा जेष्ठता लक्षात घेऊन काही शाळांमध्ये त्यांनी मुख्याध्यापक पदाची सुत्रे हाती देण्यात आली. परंतु ती केवळ नावापुरतीच असल्याचे दिसत आहेत. त्यांना तसे कोणतेही अधिकार देण्यात आले नसल्याचा सांगण्यात येत आहे. आता तर ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्याची बाब समोर येत आहे. एका शाळेत ७ शिक्षक असतात ७ पैकी ५-६ शिक्षकांना बीएलो चे आदेश देण्यात आले आहेत. शाळा क्र .९५ काजुवाडी ,शाळा क्र. १७ कोपरी येथे मुख्याघ्यापक सह सर्व शिक्षकांना आदेश देण्यात आल्याचे शिक्षक संघटनांचा दावा आहे. तसेच एका शिक्षिकेला डोळ्याचा आजार आहे. काहींना गुडघ्यांचे आजार आहेत आशा शिक्षकांना देखील अशा कामांना लावण्यात आले आहे. त्यामुळे किमान अशा शिक्षकांना तरी वगळण्यात यावेत अशी मागणी, शिक्षण संघटनेने शिक्षण विभागाकडे केली आहे. प्रशासनाने खाजगी शाळेसह इतर विभागातील कर्मचाºयांना आदेश काढावेत व एका शाळेत किमान एकाच शिक्षकाला बीएल ओचे आदेश दयावेत, अन्यथा आम्हाला ही इतर शिक्षकांना प्रमाणे कोर्टात जावे लागेल असा इशाराच आता या शिक्षकांनी दिला आहे.