राजस्थानच्या अपहृत दोन संचालकांची ठाणे पोलिसांनी केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 10:11 PM2018-09-10T22:11:41+5:302018-09-10T22:23:35+5:30

उदयपूर येथील एका वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २५ लाखांची रोकड, कार आणि तलवारही जप्त करण्यात आली आहे.

Thane police have rescued two Rajasthan youths who kidnap by Six extortionist | राजस्थानच्या अपहृत दोन संचालकांची ठाणे पोलिसांनी केली सुटका

२५ लाखांची रोकड, कार आणि तलवार हस्तगत

Next
ठळक मुद्दे मुंबईच्या पोलीस हवालदारासह सहा जणांना अटक२५ लाखांची रोकड, कार आणि तलवार हस्तगतचौघांना मिळाली पोलीस कोठडी

ठाणे : उदयपूर (राजस्थान) येथील एका खासगी वित्त संस्थेकडे मोठे कर्ज मागण्याच्या बहाण्याने दोन संचालकांचे अपहरण करून त्यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा डाव ठाणेखंडणीविरोधी पथकाने उधळून लावला. यातील लेनीन कुट्टीवट्टे याच्यासह सहा जणांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून ही २५ लाखांची रोकड आणि तलवारही हस्तगत केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. विशेष म्हणजे आरोपींमध्ये तुकाराम मुदगन या मुंबईच्या पोलीस हवालदाराचाही समावेश आहे.
उदयपूरच्या ‘श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड’ या कंपनीकडे लेनीन आणि त्याच्या साथीदारांनी आधी मालमत्तेच्या तारणावर मोठ्या कर्जाची मागणी केली. त्यानंतर कल्याण, भिवंडी परिसरातील मालमत्तेची मूळ कागदपत्रे आणि मालमत्ता दाखवण्याच्या बहाण्याने देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी (रा. दोघेही उदयपूर, राजस्थान) या दोन्ही संचालकांना ठाण्याच्या अशोक सिनेमागृह भागात बोलवले. त्यांचे ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वा.च्या सुमारास अपहरण करून डोंबिवलीतील इस्टेट एजंटच्या कार्यालयात त्यांना नेले. तिथे तलवारीच्या धाकावर तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडे एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाही, तर ठार करण्याचीही त्यांनी धमकी दिली. भीतीने देवानंद यांनी अखेर २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. उदयपूर येथून त्यांचा साथीदार पैसे घेऊन येईपर्यंत देवानंदसह दोघांनाही कल्याण येथील एका लॉज आणि घरात ठेवले. त्यानंतर, ८ सप्टेंबर रोजी हे पैसे घेऊन आलेल्याला त्यांनी आपल्या गाडीत घेतले. त्याची गाडी मात्र खंडणीखोरांनी परत पाठवण्यास सांगितली. त्याचवेळी देवानंद यांच्या मित्राने ही माहिती ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना दिली. त्यानंतर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक रमेश कदम, विकास बाबर, अविनाश महाजन, रोशन देवरे, हेमंत ढोले, जमादार जानू पवार, हवालदार संजय भिवणकर, अंकुश भोसले आणि नितीन ओवळेकर आदींच्या पथकाने सापळा लावून अपहरणकर्त्यांची गाडी कल्याण भागातून पाठलाग करून ८ सप्टेंबर रोजी पकडली. याच गाडीतून त्यांनी एका अपहृत संचालकांची सुटका केली. त्यावेळी लेनीन आणि शेलार यांना २५ लाखांच्या रोकड आणि कारसह शनिवारी सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून अन्य एका संचालकाची हाजीमलंग रोड येथील घरातून सुटका केली. तिथून सागर साळवे, ओमप्रकाश जैस्वाल, अभिषेक झा आणि पोलीस हवालदार तुकाराम मुदगन अशा चौघांना ९ सप्टेंबर रोजी तलवारीसह अटक केली. यातील साळवेसह चौघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

-----------------------

Web Title: Thane police have rescued two Rajasthan youths who kidnap by Six extortionist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.