ठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "बटाट्याची चाळ" चे अभिवाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:52 PM2018-11-17T14:52:50+5:302018-11-17T14:56:07+5:30
पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त "बटाट्याची चाळ" चे अभिवाचन केले.
ठाणे : गेली वर्षभर सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या वाचक कट्टयावर "बटाट्याची चाळ" या पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले. पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले होते. वाचक कट्ट्याच्या कलाकारांनी यात उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला होता. यंदाचा हा २३ क्रं चा वाचक कट्टा होता. साहित्य व कला क्षेत्रात आपला स्वतंत्रपणे ठसा उमटवणारे व्यक्ती म्हणजे पुलं होय. पुलंचा विनोद हा सदा सरळ असायचा म्हणूनच सर्व सामान्य लोकांना पूल आपलेसे वाटायचे. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे असून त्यांनी अनेक पुस्तके,कादंबऱ्या, नाटके, बालनाट्ये लिहिली आहेत. पुलंचे गमतीदार किस्से आजही आठवले कि लोकं हसू लागतात. या वेळी सुष्मा रेगे यांनी "बटाट्याची चाळ" या पुस्तकातील भ्रमण मंडळ हि कथा सादर करत उपस्थित प्रेक्षकांना साहित्याच्या वातावरणात नेले.आजच्या युगात हि साहित्याची ताकत किती मजबूत आहे हे त्यांच्या वाचनातून समजले. राजन मयेकर यांनी सांस्कृतिक चळवळ या कथेचे वाचन केले,माधुरी कोळी यांनी काही स्त्री गीते,सहदेव कोळंबकर याने निष्काम साहित्यसेवा व राजश्री गढिकर यांनी एक चिंतन या कथेचे अभिवाचन केले. तसेच रोहिणी थोरात हिने सखाराम गटणे, रुक्मिणी कदम यांनी पुलंचे ११ गमतीदार किस्से सांगितले,वैभव पवार याने गणगोत पुस्तकातील बळवंत पुरंदरे या कथेचे वाचन केले. रोहिणी राठोड यांनी व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील नामुपरिट हि कथा वाचली. प्रथमेश मंडलिक,शुभम कदम,सहदेव साळकर, वैभव पवार,ओमकार मराठे,उत्तम ठाकूर या कलाकारांनी "तीन पैशांचा तमाशा" या पुस्तकातील विविध कथांचे अभिवाचन केले. यावेळी कट्ट्याचे निवेदन व दीपप्रज्वलन राजन मयेकर यांनी केले.या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्य क्षेत्रातील नामवंत मंडळी यावेळी वाचक कट्टयावर उपस्थित होती. आपण वेगवेगळे विषय घेऊन वाचक कट्टयावर येऊ शकता,आम्ही आपणास नक्कीच व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करू असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सर्व उपास्थितांना सांगितले.