ठाणे आरटीओला ‘डिजिटल’द्वारे २७ कोटींचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:18 AM2017-12-28T03:18:07+5:302017-12-28T03:18:15+5:30
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने १ डिसेंबरपासून सर्व शुल्क व कर आॅनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली.
ठाणे : ठाणे प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने १ डिसेंबरपासून सर्व शुल्क व कर आॅनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली. डिसेंबर महिन्यातील २५ दिवसांत १२ हजारांहून अधिक लोकांनी आॅनलाइन अर्ज केले आहेत. तसेच याच दिवसांत शासकीय तिजोरीत जमा झालेल्या २९ कोटी ५० लाखांपैैकी २७ कोटी ५० लाख रुपये महसूल डिजिटल पेमेंटद्वारे मिळाला. हे प्रमाण ९३ टक्के असल्याने ठाण्याचा नंबर पुणे, पिंपरी-चिंचवड या आरटीओ कार्यालयांनंंतर लागला आहे.
प्रादेशिक परिवहन विभागात १६ सेवा यापूर्वीच आॅनलाइन केल्यानंतर ठाणे आरटीओ विभागाने १ डिसेंबरपासून सर्व शुल्क व कर आता आॅनलाइन स्वीकारण्यात येतील, असे जाहीर करून कुठलेही शुल्क भरण्यासाठी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही, असे म्हटले होते. त्यानुसार, १ ते २६ डिसेंबरदरम्यान १२ हजार ८५ जणांनी विविध प्रकारे अर्ज केले. यामध्ये कर (टॅक्स) संदर्भात सर्वाधिक ४ हजार ६२३ अर्ज आहेत. त्यापाठोपाठ वाहनाच्या हस्तांतरणासाठी ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी दोन हजार ५२९ अर्ज आले आहे. तसेच जुन्या वाहनांचे त्रैमासिक, वार्षिक कर भरणे, वाहनांमधील बदल, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र,वाहनावर कर्ज बोजा नोंदवणे,योग्यता प्रमाणपत्र आदी त्यासाठी लोकांनी अर्ज केले आहे. त्याचबरोबर कर आणि इतर शुल्क असा एकूण २७ कोटी ५० लाखांचा महसूलजमा झाला आहे. यामध्ये दोन कोटी रुपयांचा महसूल हा कॅशस्वरूपात स्वीकारला असून उर्वरित डिजिटल पेमेंटद्वारे जमा झाला आहे.
>हेल्प डेस्कवर भर देणार
आॅनलाइन येणाºया काही अडचणी सोडवण्यासाठी हेल्प डेस्क सुरू करणार आहे. तसेच बस आणि ट्रक यासारख्या असोसिएशन आणि वाहनविक्रेत्यांसाठी लवकरच आॅनलाइन सेवेबाबत शिबिर घेतले जाणार आहे.
>२० हजार कागदांची बचत
आॅनलाइन सेवा सुरू झाल्याने कागदांची बचत होऊ लागली आहे. एखाद्या कामाला साधारणत: दोन पावत्या दिल्या जात होत्या. त्या आता द्याव्या लागत नाहीत. त्यामुळे सध्या तरी २० हजार कागदांची बचत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
>‘‘१ डिसेंबरपासून आतापर्यंत आॅनलाइन सेवेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. यामध्ये काही अडचणी आहेत. पण, त्या अडचणी सोडवून ती सेवा अजून चांगली कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. यामुळे वेळेची बचत होणार आहे.’’
- जितेंद्र पाटील, अधिकारी, ठाणे आरटीओ (कोकण विभाग)