ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई : मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 10:57 PM2018-02-02T22:57:52+5:302018-02-02T23:14:01+5:30
छानछौकीसाठी दुचाकी चोरुन त्याच दुचाकीवरुन मोबाईलची जबरी चोरी करणा-या एका दुकलीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. लाखाची दुचाकी अवघ्या काही हजारांमध्ये हे टोळके विक्री करीत होते.
ठाणे: मीरा भार्इंदर परिसरात मोटारसायकल आणि मोबाईलची जबरी चोरी करणा-या शुभम सिंग (२०,रा. काशीनगर, भार्इंदर पूर्व) याच्यासह एक अल्पवयीन मुलगा अशा दोघांना ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सिंग याला ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून १५ मोटारसायकली आणि ११ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
ठाणे ग्रामीण भागातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी आदेश दिले होते. याच संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीमीरा युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक एस. एस. करांडे , अभिजित टेलर, जमादार अनिल वेळे, हवालदार विजय ढेमरे, चंद्रकांत पोशिरकर, मच्छिंद्र पंडीत, अर्जून जाधव, पोलीस नाईक अशोक पाटील, संजय शिंदे, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, सचिन सावंत, प्रदीप टक्के तसेच राजेश श्रीवास्तव, सतिश जगताप आणि अतुल केंद्रेयांच्या पथकाने खबरी आणि सीसीटीव्हीच्या आधारे ३१ जानेवारी रोजी सिंग याला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याच्याकडील दुचाकी ही त्याने मीरारोड शांतीपार्क येथून साथीदाराच्या मदतीने चोरल्याची कबूली दिली. अधिक चौकशीत त्याने मीरा भार्इंदर आणि परिसरातून चोरी केलेल्या १५ विविध मोटारसायकलींची त्याने माहिती दिल्यानंतर त्याही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. त्याच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. सिंग याच्या साथीदारांचा एम-२३ नावाची टोळी असून चोरलेल्या दुचाकींवर त्यांनी तसे स्टीकरही लावले होते. चोरलेल्या मोटारसायकलींवरुनच त्यांनी ११ मोबाईल जबरीने हिसकावले. तेही त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या आणखी साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..........................
लाखाची दुचाकी अवघ्या पाच हजारांमध्ये
ही टोळी लाखांच्या दुचाकीची चोरी केल्यानंतर तिची अवघ्या पाच हजारांमध्ये विक्री करीत होती. या पाच हजारांमध्ये मौज मजा तसेच मादक पदार्थांसाठीही ते उडवत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.