ठाण्यातील तरुणाचा खून करून महिलेचे बंगलोरला पलायन
By जितेंद्र कालेकर | Published: March 20, 2018 11:30 PM2018-03-20T23:30:45+5:302018-03-20T23:30:45+5:30
अनैतिक संबंधातून ठाण्यातील एका तरुणाचा खून करुन बंगलोरला पसार झालेल्या महिलेला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासांमध्ये ताब्यात घेतले आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे : आधी प्रेमाच्या आणाभाका घेत विश्वासात घेऊनही ऐनवेळी लग्नाला नकार देणा-या कबिर लष्कर (२५) या तरुणाचा खून करून पसार झालेल्या क्षमाबेगम अन्वर लष्कर (२८) या विवाहितेला ठाणे पोलिसांनी अवघ्या २४ तासातच थेट बंगलोर येथून मंगळवारी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे कोणताही धागादोरा नसतांना यातील तिचा शोध घेण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे.
घोडबंदर रोडवरील अन्वर लष्कर याच्या सायकलच्या दुकानात दुरुस्ती आणि देखभालीचे काम कबीर करीत होता. तिथे नोकरीला असल्यानेच त्याची आणि अन्वरची पत्नी क्षमाबेगम यांची ओळख झाली. याच ओळखीतून त्यांच्यात अनैतिक संबंधही निर्माण झाले. त्याने तिचा विश्वास संपादन करून लग्न करण्याची तयारीही दाखविली. त्यासाठी तू घर सोडून दे, घर सोडल्यानंतर आपण दोघेही लग्न करू, असे तिला त्याने अमिष दाखविले. प्रत्यक्षात ती त्याच्यासाठी घर सोडून आल्यानंतर मात्र त्याने लग्नाला नकार दिला. यातूनच त्यांच्यात १७ मार्च रोजी वाद झाला. याच वादातून तिने कबीरचा गळा आवळून खून केल्यानंतर त्याच्या गुप्तांगावरही तीक्ष्ण हत्याराने वार केला. नंतर त्याच्या डोक्यावरही विटेने प्रहार करून तिथून पलायन केले. आपले बिंग फुटू नये म्हणून तिने थेट बंगलोरमधील आपले मूळ घर गाठले. दरम्यान, १९ मार्च रोजी दुपारी वामन तेलगावे यांचा भाडेकरू असलेल्या कबीरच्या घरातून दुर्गंधी आल्याने हा खुनाचा प्रकार उघड झाला. घटनास्थळी कोणताही दागादोरा नसतांना पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक पोलीस आयुक्त महादेव भोर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, निरीक्षक वैभव धुमाळ आणि नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने मंगळवारी थेट विमानाने बंगलोर गाठून क्षमा बेगम हिला तिच्या घरातून ताब्यात घेतले. तिला बुधवारी ठाण्यात आणले जाणार आहे. या खुनात तिने आणखी कोणाची मदत घेतली? खुनाचे आणखीही काही कारण आहे का? या सर्वच बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले.