शेजा-याची मुलाची हौस भागविण्यासाठी केली बाळाची चोरी: ठाण्यातील ‘त्या’ महिलेची कबूली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 08:48 PM2018-01-16T20:48:45+5:302018-01-16T21:11:05+5:30
बाळाचे अपहरण करणा-या दाम्पत्याकडून मिळालेल्या अन्य सहा मुलांची डीएनए चाचणी करण्याची अनुमती बाल कल्याण समितीने ठाणे पोलिसांना दिली आहे. लवकरच ही तपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे: शेजा-याला मुलगा हवा होता. त्याच्याच सांगण्यावरुन ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नवजात बाळ चोरल्याची कबुली गुडिया राजभर या महिलेने ठाणे पोलिसांना दिली. तिने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अवघ्या चार तासांच्या बाळाचे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण करणा-या गुडिया (३५), तिचा पती सोनू राजभर (४०) तसेच विजय श्रीवास्तव उर्फ कुबडया (५५) या तिघांनाही ठाणे न्यायालयाने २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तातडीने या प्र्रकरणाचा छडा लावल्याबद्दल न्यायालयानेही तपास पथकाची पाठ थोपटली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने डोंबिवलीच्या पिसवली गावातील आडवली, नेताजीनगर भागातून गुडियासह तिघांना सोमवारी दुपारी अटक केली. त्यांच्याकडून अपहरण झालेल्या बाळासह सीता राजभर (दोन महिने), अनिता (५), सूरज (३), सुप्रिया (११), सोनी (९) आणि खुश्बू (७) या सहा मुलांना ताब्यात घेण्यात आले. ही सर्व मुले आपली स्वत:ची असल्याचा दावा राजभर दाम्पत्याने केला आहे. मात्र, मुंबईतील कालीना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून डीएनए तपासणी केल्यावरच अंतिम सत्य बाहेर येईल, असे तपास अधिका-यांनी सांगितले. मंगळवारी या सर्व मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले होते. या सर्वच मुलांची डीएनए तपासणी करण्याची परवानगी बालकल्याण समितीने ठाणे पोलिसांना दिली.
शेजा-याच्या कल्पनेतून आखला चोरीचा बेत...
बाळाचे अपहरण करणारी गुडिया नेताजी नगरातील दीड हजारांच्या भाड्याच्या खोलीत सहा मुले आणि पतीसह वास्तव्याला आहे. तिला पाच मुली आणि एक मुलगा आहे. आणखी एक मुलगा असावा, अशी तिची अपेक्षा होती. त्यातच विजय श्रीवास्तव उर्फ कुबडया या शेजा-यालाही मुलगा नव्हता. त्यानेही मुलाची गरज असल्याचे तिला बोलून दाखविले. या दोघांच्या कल्पनेतूनच बाळाच्या अपहरणाचा बेत शिजला आणि अपहरण केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.