थीम पार्क भ्रष्टाचारावरून शिवसेना-भाजपात कलगीतुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:13 AM2018-10-17T00:13:07+5:302018-10-17T00:13:38+5:30
आरोपांना नरेश म्हस्केंचे प्रत्त्युत्तर : वृक्षलागवडीच्या चौकशीची मागणी
ठाणे : नंदलाल प्रकरणानंतर थीम पार्कमध्ये ८२ टक्क्यांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केल्यानंतर त्याला शिवसेनेने प्रत्त्युत्तर दिले आहे.
नंदलाल प्रकरणात ज्यांच्यावर आरोप झाले त्यातील काही जण हे केळकर यांच्याबरोबर दौऱ्याला होते, त्यांना भाजपाने तिकिटे दिली असल्याचा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी केला. पालकमंत्र्यांवर केलेले आरोप हे बिनबुडाचे असून याचा आम्ही निषेध करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हस्केंच्या पलटवारानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.
सोमवारी आमदार केळकर यांनी थीम पार्कचा पाहणी दौरा केल्यानंतर नंदलाल समितीचा उल्लेख करतानाच पालकमंत्र्यांनी चौकशी सुरूअसलेल्या ठेकेदारास भेट घेणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांच्यावर म्हस्के यांनी मंगळवारी पलटवार केला.
दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीमध्ये भाजपाच्या नगरसेवकांनी या प्रकरणावर चर्चा केली होती; परंतु अचानक त्यांचा आवाज का दाबला गेला, कोणाचा फोन आला आणि कोणी हे प्रकरण थांबविले, असा उलट सवाल त्यांनी केळकर यांना केला. या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठविला आहे, समितीच्या माध्यमातून चौकशीसुद्धा केली जाणार आहे. जेजे स्कूल आॅफ आर्टचा अहवालही येणार आहे. त्यामुळे आम्ही ठेकेदाराच्या बाजूने आहोत, असे आरोप करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
दरवर्षी नितीन देसाई यांच्याकडूनच टेंभीनाक्यावरील देवीचे डेकोरेशन करून घेतले जाते आणि सर्वांसमोर त्यांची भेट झालेली आहे. उलट देसाई हे केवळ महापालिकेपुरते मर्यादित नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या कलावंतासाठी एक एक तास देतात. अमित शहा, पीयूष गोयलही त्यांना भेटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांनी सुद्धात्यांच्या भेटी घेतल्या आहेत. याचे फोटोही त्यांनी पत्रकार परिषदेसमोर सादर केले. त्यामुळे अशा प्रकारे पालकमंत्रीच भेटले म्हणून आक्षेप घेणे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला.
एकूणच केळकर यांचा पाहणी दौरा हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असून ज्या भागात हे गार्डन आहे, त्या भागाचे नगरसेवक हे भाजपाचे असून त्यांनी यापूर्वी आवाज का उठविला नाही, असा उलट सवालही त्यांनी केला.