चौकशी समितीला प्रशासनाचे सहकार्य नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:38 AM2019-02-23T00:38:40+5:302019-02-23T00:38:55+5:30
सदस्यांचा आरोप : आठ कोटींची शिल्पे गायब. महासभेत चौकशीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्रशासन उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला.
ठाणे : थीम पार्कच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या लोकप्रतिनिधींच्या समितीला प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत समिती सदस्यांनी केला. प्रशासन सहकार्यच करणार नसेल, तर सभागृह निर्णय घेण्यास सक्षम असल्याचा इशारा यावेळी सदस्यांनी दिला. आचारसंहिता लागण्यापूर्वी थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे उपलब्ध करून तसा लेखी अहवाल सभागृहाला सादर करण्याची मागणी सदस्यांनी केली.
महासभेत चौकशीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे प्रशासन उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला. गुरुवारी संध्याकाळी थीम पार्क आणि बॉलीवूड पार्कची पाहणी केली असून दोन्ही कामांमध्ये ठेकेदाराने महापालिकेची कशा प्रकारे फसवणूक केली आहे, याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
ठेकेदाराच्या खात्याची माहिती गुलदस्त्यात
पालिकेने बॉलीवूड पार्कमधील ज्या शिल्पांसाठी वर्षभरापूर्वी आठ कोटी रु पये मोजले आहेत, ती शिल्पे या पार्कमध्ये नसल्याचीच माहिती या दौऱ्यात उघड झाली. त्याशिवाय, हे पार्कआहे की, ठेकेदाराच्या कंपनीच्या भंगार सामानासाठी तयार केलेले डम्पिंग ग्राउंड आहे, असा प्रश्नही चौकशी समितीच्या सदस्यांनी केला.
या दोन्ही पार्कची चौकशी करणाºया समितीला प्रशासनाकडून योग्य सहकार्य मिळत नसून ठेकेदाराच्या बँक खात्यातून कोणाला चेक दिले, याची माहितीदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली नाही. याशिवाय, प्रशासनाने नेमलेल्या सदस्यांनीदेखील लोकप्रतिनिधींच्या सदस्यांची भेट घेतली नसल्याचे मुल्ला यांनी सांगितले.
चौकशी समितीचे सदस्य आक्र मक झाल्याने अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासंदर्भात संबंधित अधिकाºयांना सूचना देण्यात येणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली.
जे.जे. स्कूलच्या समितीतही गैरव्यवहार?
थीम पार्कमध्ये उभारलेल्या शिल्पांची जी किंमत जे.जे. स्कूल आॅफ आर्ट्सच्या समितीने नोंदवली आहे, त्यातसुद्धा गैरव्यवहार झालेला आहे की काय, असा संशय येथील कामे बघितल्यानंतर बळावत असल्याचे नजीब मुल्ला यांनी महासभेत सांगितले. थीम पार्कची कामे निविदेतील अटीशर्र्तीनुसार झालेलीच नसून कामासाठी वापरलेले साहित्य दुय्यम दर्जाचे असल्याने वर्षभरातच त्यांची प्रचंड वाताहत झालेली आहे. आणखी एखाद्या पावसाळ्यानंतर हे पार्क उजाड होऊन संपूर्ण खर्च पाण्यात जाईल, अशी भीतीही या सदस्यांनी व्यक्त केली.