ठाण्यात परीक्षेच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या: बाळकूममधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 07:38 PM2018-02-22T19:38:11+5:302018-02-22T21:04:54+5:30
शालांत परीक्षेच्या तणावातून रचना शिंगे या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना बाळकूम येथे गुरुवारी घडली. तिचे चुलते अनिल शिंगे यांनी घराचा दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी तो तोडला. त्यावेळी हा प्रकार उघड झाला.
ठाणे : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शालांत परीक्षेच्या तणावातून रचना सुर्यकांत शिंगे या १५ वर्षीय विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना बाळकूम येथे गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, तिच्या कुटूंबियांनी तिचे नेत्र मरणोत्तर दान करुन एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला.
नौपाडयातील डॉ. बेडेकर विद्यामंदीर या शाळेत शिकणारी रचना बाळकूमच्या नर्मदा निवास येथे दुस-या मजल्यावर वास्तव्याला होती. तिचे वडील सुर्यकांत हे खासगी नोकरीला आहेत. तर आई ब्युटी पार्लर चालविते. त्यामुळे आई दुकानात तर वडील कामावर आणि लहान १२ वर्षीय भाऊ बाहेर गेलेला असतांनाच सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे चुलते अनिल केशव शिंगे यांनी सकाळी काही कामानिमित्त रचनाच्या घराचा दरवाजा वाजविला. बराच वेळ आवाज देऊन आणि दरवाजा वाजवूनही उघडला न गेल्यामुळे त्यांनी तो तोडला. तेंव्हा तिने गळाफास घेतल्याचे दृश्य त्यांना पहायला मिळाले. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून ती दहावी परीक्षेच्या तणावामध्ये होती, असे तिच्या आईवडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे, असे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पोलीस उपनिरीक्षक शारदा देशमुख या अधिक तपास करीत आहेत.
रचनाचे मरणोत्तर नेत्रदान
रचनाच्या आत्महत्येमुळे तिचा मृतदेह ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी गुरुवारी सकाळी आला. त्यावेळी तिचे डोळे दान करणार का? अशी विचारणा रुग्णालयाच्या वतीने तिच्या वडीलांकडे करण्यात आली. तेंव्हा फारसा विचार न करता पाणावलेल्या डोळयांनीच सूर्यकांत शिंगे यांनी या संकल्पनेला होकार देत तिचे मरणोत्तर नेत्रदान केले. शाळेत नेहमीच हुशार असलेली रचना शालांत परिक्षेतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी तिच्यासह कुटूंबियांचीही अपेक्षा असतांना तिने थोडयाशा तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.