ठाण्यात मागितली साडेतीन कोटींची लाच ; उपजिल्हाधिकाऱ्यासह खाजगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 08:21 PM2018-10-23T20:21:27+5:302018-10-23T20:25:40+5:30
लाचेची मागणी करत ती स्विकारताना शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी रंगेहात पकडले जातात. त्यानंतर गुन्हे दाखल होतात. त्याचप्रमाणे लाचेची मागणी करणा-यांविरोधातही गुन्हे दाखल होऊ लागले आहेत.
ठाणे : अंबरनाथ येथील एमआयडीसीमध्ये दहा हजार चौ.मीटरचा प्लॉट मंजुरीसाठी ३ कोटी ५० लाखांच्या लाचेची मागणी करणा-या ठाणे वागळे इस्टेट एमआयडीसीच्या उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी संदीप जयंतराव पवार (३५) आणि खाजगी व्यक्ती शुल्का यांच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे लाचलुचपत विभागाने दिली.
तक्रारदारांकडे त्या दोघांनी तो प्लॉट मंजुरीसाठी प्रती चौ.मीटरला चार हजारांप्रमाणे लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती प्रती चौ.मीटरला ३ हजार पाचशे रुपये देण्याचे ठरले . त्याचदरम्यान तक्रारदारांनी ठाणे एसीबीत कार्यालयात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात याबाबत पडताळणी केल्यावर लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे एसीबीने सांगितले.