ठाण्यातील ‘सिझर’ बारवर गुन्हे अन्वेषण विभागाची धाड: १८ बारबालांसह ३२ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 09:27 PM2017-12-17T21:27:26+5:302017-12-22T13:53:17+5:30
रात्री ९.३० पर्यंत चार मुलींना बारमधील कामासाठी ठेवण्याची अनुमती असतांना वागळे इस्टेट येथील या बारमध्ये १८ मुली आढळल्या. त्यातील नऊ मुलींना तर एका अरुंद पोकळीमध्ये लपविल्याचे धाडीत उघड झाले.
ठाणे: गि-हाईकांसमोर अश्लील चाळे करीत रात्री उशिरापर्यं बारमध्ये थांबलेल्या १८ बारबालांसह ३२ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक ने अटक केली आहे. कारवाईच्या भीतीने एका अरुंद पोकळीत लपविलेल्या नऊ मुलींचीही सुटका या पथकाने केली.
वागळे इस्टेट येथील अॅपलॅब कंपनीसमोरील कृष्णा को आॅपरेटीव्ह या इमारतीमध्ये असलेल्या ‘सिझर पार्क’ या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत लेडीज सर्व्हिसच्या नावाखाली गिºहाईकासमोर बारबाला अश्लील वर्तन करीत असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे शनिवारी रात्री ११.३० ते पहाटे ४ वा. च्या दरम्यान या पथकाने कारवाई करुन बारचा चालक विश्वनाथ शेट्टी, व्यवस्थापक गणेश शेट्टी यांच्यासह १४ जणांना तसेच नऊ बार बालांना ताब्यात घेतले. त्यानंतर एका अरुंद पोकळीतून आणखी ९ बार बालांचीही त्यांनी सुटका केली. ठाणे न्यायालयाने विश्वनाथ आणि गणेश शेट्टी वगळता सर्वांची जामीनावर सुटका केली आहे. पोलिसांच्या छाप्यानंतर या मुली मिळू नयेत म्हणून त्यांना एका अरुंद पोकळामध्ये लपवून त्यांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी दोघांवरही गुन्हे दाखल केल्याने त्यांना न्यायालयाने जामीन नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अशी होती पोकळी अरुंद
बारमध्ये रात्री ९.३० वा. पर्यंत चार मुलींना लेडीज सर्व्हिस साठी अधिकृतरित्या परवानगी आहे. बार मालकाने रात्री १२ नंतरही चक्क १८ मुलींना याठिकाणी ठेवले होते. त्यातील ९ मुलींना तर एका लाकडाच्या कपाटातील अरुंद चार पोकळयांमध्ये लपवून ठेवल्याचे या धाडीत उघड झाले. पोलिसांनी संशयित कपाट तोडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या पोकळीतून बाहेर पडण्यासाठीही एक छुपा मार्ग होता.