पुस्तके कमी झाली असली तरी वाचन कमी झालेले नाही- सदानंद मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:04 AM2019-06-03T01:04:56+5:302019-06-03T01:05:06+5:30
मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ व ‘अॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार’ सोहळा शनिवारी पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात पार पडला.
ठाणे : ग्रंथव्यवहाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. वाचनाचे प्रमाण कमी होतेय, असे म्हटले जाते; मग पुस्तकांचे प्रमाण कमी होतेय का? डिजिटल स्वरूपातील पुस्तकेही वाचली जाऊ शकतात. पुस्तके कमी झाली, असे म्हणत असलो तरी वाचन कमी झाले, असे म्हणता येणार नाही. कारण, वाचक हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वाचू लागले आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ व ‘अॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार’ सोहळा शनिवारी पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात पार पडला. यावेळी डॉ. मोरे म्हणाले की, ग्रंथालयांचे महत्त्व वाढले आहे. ग्रंथालयात ग्रंथ वाचून ते परत दिले जातात आणि गॅझेटवर वाचतात म्हणजे हा ग्रंथव्यवहाराचा विस्तार आहे. पुस्तके हातात घेऊन वाचण्याचा वेगळाच आनंद असतो. तरुण पिढीला जुन्या पिढीने पुस्तक हातात घेऊन वाचा, असे सांगितले पाहिजे. पुस्तकांचे महत्त्व तरुण पिढीला कळण्यासाठी त्यांना इतिहासाची गोडी लावावी. आधुनिक पिढीवर टीका करताना त्यांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावे. तरुण पिढीला पुस्तकांचे महत्त्व कळण्यासाठी पुस्तकांना पुरस्कार देणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
ग्रंथांना पुरस्कृत करण्याचे धोरण मराठी ग्रंथसंग्रहालयाने स्वीकारले आहे. अॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने दिला जातो, त्याला वेगळे महत्त्व आहे. सामान्य माणसाला चांगल्या पुस्तकाची निवड करता येईलच, असे नाही. पुरस्कारांमुळे त्यांना चांगले पुस्तक निवडून ते वाचण्याची संधी मिळते, असे मत डॉ. मोरे यांनी
मांडले.
अनुवादित पुस्तकांबद्दल आपले मत मांडताना डॉ. वसुधा सहस्रबुद्धे म्हणाल्या की, अनुवाद करताना अनुवाद करणाºया लेखकाला परकाया प्रवेश करावा लागतो. दुसºया प्रांतांतील, भाषांतील माणसे, त्यांची नाती, संस्कृती समजून घ्यायला लागते. आपल्या भाषेसाठी त्यांना जोडावे लागते. तेव्हा ती पुस्तके पुरस्कारासाठी समोर येतात. हौस म्हणून अनुवाद करता येत नाही. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.