गणेशपूजनासाठी ठाणे जिल्ह्यात पाच हजार पुरोहित, परराज्यांतून मिळतोय प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 03:38 AM2017-08-24T03:38:26+5:302017-08-24T03:38:45+5:30
गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमधील एकूण पाच हजार पुरोहित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. डोंबिवलीतच एक हजार पुरोहित येतात.
- जान्हवी मोर्ये।
डोंबिवली : गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमधील एकूण पाच हजार पुरोहित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. डोंबिवलीतच एक हजार पुरोहित येतात. त्यात परराज्यांसह कोकण, मराठवाडा, खान्देश येथील पुरोहितही आहेत.
डोंबिवलीतील ल.कृ. पारेकर गुरुजी यांनी सांगितले, श्रावण ते गणपती आणि नवरात्रात बाहेरून पुरोहित ठाणे उपनगरांत येतात. अनेक पुरोहितांचे यजमान ठरलेले आहेत. ते त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून येथे येतात. गणेशपूजनासाठी त्यांचा चार दिवस मुक्काम असतो. डोंबिवली यजुर्वेदीय आणि ऋग्वेदीय पुरोहित मंडळे आहेत. मात्र, पुरोहितांना गणेशपूजनाची कामे मंडळांपेक्षा एकमेकांच्या ओळखीने मिळतात. अथर्वशीर्ष मंत्रपठण करणारे मंडळही येथे आहे. हे मंडळ मंत्रपठणासाठी पुरोहित पुरवते.
काही पुरोहित गणेशमूर्ती स्थापनेची वेळ सूर्योदयापूर्वी ते माध्यान्हापर्यंत पाळतात. या वेळेत एका पुरोहिताकडून किमान सात ते आठ गणेशमूर्तींची स्थापना होते. घरगुती गणेशपूजन व स्थापनेचा मुहूर्त अनेक वेळा पाळला जातो. परंतु, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत माध्यान्हापर्यंतची मुहूर्ताची वेळ पाळली जात नाही.
दिवसभरात कधीही गणेशाची स्थापना क रता येऊ शकते. भद्रायोग आणि मंगळाचा होरा पाहून गणेशमूर्तीची स्थापना केली जाते, असे काही ज्योतिषी सांगतात. परंतु, त्याला काही शास्त्राचा आधार नाही. त्याकडे दुर्लक्ष केले तरी चालते.
डोंबिवलीत घरगुती व सार्वजनिक मंडळे, अशी मिळून सव्वा लाख गणेशमूर्तींची स्थापना होते. परराज्यांतून येणारे एक हजार पुरोहित सोडून खुद्द शहरात आठ हजार पुरोहित पौरोहित्य करतात. हे आठ हजार पुरोहित उच्चशिक्षित आहेत, तर काही निवृत्तही झालेले आहेत.
सध्या सोशल मीडिया व डॉट कॉमचा जमाना आहे. त्यामुळे इंटरनेट, चॅनल, कॅसेट, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पूजा सांगितली जाते. त्याचा फायदा पुरोहितांना होत आहे. याद्वारेही पूजेसाठी नोंदणी केली जाते. मात्र, त्याचे प्रमाण फारसे लक्षणीय नाही. या माध्यमातून भक्तांना
विविध सुविधा देऊन आकर्षित केले जाते. त्यामुळे ही सेवा त्यांना स्वस्तात पडते.
पारेकर यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांच्याकडे ४० गणेशपूजनाची नोंदणी झाली आहे. परराज्यांतून त्यांच्याकडे चार पुरोहित आले आहेत. ते त्यांच्यासोबत वास्तव्याला आहे. गौरी विसर्जनानंतर ते त्यांचे काम आटोपून घरी परतणार आहेत.
‘पूजनाचे पावित्र्य जपणे महत्त्वाचे’
घरगुती, सार्वजनिक मंडळांबरोबर कंपन्या, मॉलमध्येही गणेशोत्सव साजरा होतो. तेथे गणेशमूर्ती स्थापनेसाठी किमान पाच हजार रुपयांची दक्षिणा मिळते. एका पूजनाचे एका पुरोहिताला ११०० ते २१०० रुपये दक्षिणा मिळते.
भक्त गणेशोत्सवात दिवाळीसारखाच खर्च करतो. गणेशोत्सवाला ‘फंक्शन’चे स्वरूप आले आहे. पुरोहिताकडून पूजन केले, तरी ते उत्साही असावे. धार्मिक व पारंपरिक पद्धतीने पूजा सांगितली जावी. त्यातून पूजेचे आणि पूजनाचे पावित्र्य जपले जाईल, असे पारेकर म्हणाले.