ठाणे अग्निशमन विभागाच्या जाचक अटींच्या विरोधात शहरातील ५०० हॉटेल, बार व्यावसायिकांनी पुकारला अचानक एक दिवसाचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 05:30 PM2018-03-06T17:30:22+5:302018-03-06T17:30:22+5:30
अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला नसलेली हॉटेल बार सील करण्याची कारवाई महापालिकेने सुरु केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ३६ हॉटेल, बार सील करण्यात ओ आहेत. परंतु अग्निशमन दलाच्या जाचक त्रासाला कंटाळून शहरातील ५०० हॉटेल, बारवाल्यांनी आज अचानक दुपारी चार वाजल्यापासून बंद पुकारला होता.
ठाणे - महापालिकेच्या अग्नीशमन दलाने नोटीस देवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्नीशमन विभागाने केली आहे. त्यानंतर आता ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारी शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून एक दिवसाचा बंद पुकारला होता. आयुक्तांशी बुधवारी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय देखील या हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे.
अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्यावतीने नोटीसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर शनिवारी अग्निशमन विभागाने शहरातील तब्बल १३ हॉटेल सील केले होते. टप्याटप्याने उर्वरीत हॉटेलही सील केले जाणार आहेत. परंतु आता शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी एकत्रित येऊन ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या विरोधात असहकार पुकारला आहे. त्यानुसार मंगळवारी दुपारी अचानक चार वाजल्यापासून या हॉटेल व्यावसायिकांनी बंद पुकारला. महाराष्टÑ अग्निशमन कायद्याअंतर्गत आम्ही सर्व प्रकारच्या अटींचे पालन केले आहे. तसेच बी फॉर्म देखील भरुन दिला आहे. असे असतांना देखील महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत रोजच्या रोज नवनवीन अटी काढल्या जात आहेत. त्यामुळे त्यांचा हा त्रास असह्य झाल्यानेच हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती हॉटेल तथा बार असोसिएशनने दिली आहे. अग्निशमन विभागाच्या या जाचक अटींमुळे आम्हाला आमचा व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचेही मत या व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.
या संदर्भात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत दुपारी १२.३० वाजता चर्चा होणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरविली जाणार आहे.
(रत्नाकर शेट्टी - हॉटेल, बार असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी)
आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी टाकलेल्या नाहीत. दोन महिन्यापूर्वी ज्या अटी शर्ती मंजुर झाल्या त्याच आजही आहेत. त्यामुळे नव्याने कोणत्याही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत.
(शशीकांत काळे - मुख्य अग्निशमन अधिकारी, ठामपा)
कंपोडींग चार्जेस भरण्यावरुन सुरु आहे वाद
अग्निशमन दलामार्फत कोणत्याही प्रकारच्या नव्या अटी शर्ती टाकण्यात आलेल्या नाहीत. परंतु कंपोडींग चार्जेस आणि अॅडमेस्ट्रीटीव्ही चार्जेस भरण्याला या हॉटेल व्यावसायिकांचा विरोध असल्यानेच हे चार्जेस रद्द करण्यासाठी हा बंद पुकारल्याचे बोलले जात आहे.
हॉटेल, बार सील करण्याची कारवाई सुरुच
महापालिकेच्या अग्नीशमन दलाने नोटीस देवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाºया ८६ हॉटेल व बारपैकी १३ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्नीशमन विभागाने शनिवारी केली होती. त्यानंतर सोमवारी पुन्हा शहरातील १३ आणि मंगळवारी १० हॉटेल, बार अग्निशमन दलाकडून सील करण्यात आले आहेत. त्यानुसार तीन दिवसात ३६ हॉटेल, बार, लाऊंज सील करण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.