चाकूच्या धाकावर तिघांनी लुबाडले, आरोपींमध्ये एक बालगुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:02 AM2018-01-26T02:02:00+5:302018-01-26T02:02:13+5:30
नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सीताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले.
ठाणे : नवी मुंबईच्या एका पोस्टमनला चाकूच्या धाकावर लुटणाºया एका बालगुन्हेगारासह तीन आरोपींविरुद्ध नौपाडा पोलिसांनी बुधवारी गुन्हे दाखल केले. या त्रिकुटाने एकाच रात्री तीन गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नवी मुुंबईतील तुर्भे येथे राहणारे पोस्टमन सीताराम मलप्पा पुजारी हे मंगळवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास अंधेरी येथील एक कार्यक्रम आटोपून मोटारसायकलने घरी जात होते. कोपरी पुलाजवळील टीएमटी बसथांब्याजवळ ते लघुशंकेसाठी थांबले. त्या वेळी तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून त्यांना धमकावले. त्यांची मोटारसायकल, दोन मोबाइल फोन आणि ९ हजार रुपये रोख असा ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन तिन्ही आरोपी पसार झाले. या प्रकारामुळे हादरलेल्या पुजारी यांनी कसेबसे नौपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत यांनी घटनेचा संदेश तत्काळ वायरलेसवर देऊन यंत्रणेला सतर्क केले. बुधवारी सकाळी नितीन कॅडबरी चौकात नादुरुस्त मोटारसायकल घेऊन उभ्या असलेल्या एका मुलाला पोलिसांनी हटकले. मोटारसायकलला नंबरप्लेट नसल्याने पोलिसांना संशय आला. चौकशी केली असता ती मोटारसायकल तक्रारदार पोस्टमनची असल्याचे समजले. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असता त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासोबतच्या दोन्ही आरोपींची नावे मिळाली असून त्यापैकी एक जण कोपरी येथील पारशीवाडीचा, तर दुसरा वर्तकनगरचा रहिवासी आहे. ते दोन्ही आरोपी बालगुन्हेगार आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश राऊत यांनी सांगितले.
त्या पोस्टमनला चाकूच्या धाकावर लुटल्यानंतर चोरीच्या मोटारसायकलने आरोपींनी वर्तकनगर आणि राबोडी परिसरांत अशाच स्वरूपाचे आणखी दोन गुन्हे केल्याची माहितीही समोर येत आहे.
मोबाइलही गुन्हेगारांकडे-
पोस्टमनचे दोन्ही मोबाइल फोन आणि रोकड बालगुन्हेगारांच्या साथीदारांकडे असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दोन्ही आरोपी बालगुन्हेगार आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सतीश राऊत यांनी सांगितले.