मुंब्य्रात अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज चालविणारे तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 09:38 PM2018-08-14T21:38:38+5:302018-08-14T21:51:59+5:30
मुंब्य्रातील आपल्या घरातून बेकायदेशीर आंतरराष्टÑीय टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या टोळीपैकी तिघांना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून या एक्सचेंजसाठी लागणारी १४ लाखांची सामुग्री तसेच शेहजाद शेख याच्या घरातून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली.
ठाणे: अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून शेहजाद शेख (३०), शकील शेख (४०) आणि मोहमंद खान आणि (३६) या तिघांना मुंब्रा पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. यातील शेहजाद शेख याच्या घरातून एक पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे तसेच चारही आरोपींच्या घरातून २३ वायफाय राऊटर, २९१ सिम कार्ड, १९ सिम स्लॉट बॉक्स आणि लॅपटॉप असा १४ लाखांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दिली.
मुंब्रा कौसा परिसरात चार ठिकाणी अनधिकृत टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याची माहिती १३ आॅगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करणा-या पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांना मिळाली होती. तिच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, निरीक्षक अरुण क्षिरसागर यांनी सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर, उपनिरीक्षक बडे, योगेश पाटील, हवालदार सुदाम पिसे, अमोल यादव, तुषार पाटील अशी वेगवेगळी पथके तयार केली. याच पथकांनी मुंब्य्रातील कादर पॅलेस, ‘शिवाल हाईट’ या इमारतीमध्ये राहणा-या शेहजाद शेख, शकील शेख, मोहमंद मुक्तार यांना अटक केली. त्यांचा चौथा साथीदार वसीलउल्ला हाही त्याच इमारतीमधील १०२ क्रमांकाच्या सदनिकेत वास्तव्याला असून तो या धाडसत्रानंतर पसार झाला. शेहजाद याच्याकडून २५ हजारांची पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे तसेच दोन युएसबी वायर, ३ चार्जर, ४ वायफाय राऊटर, ७५ सिम कार्ड आणि ३ सिम स्लॉट बॉक्स असा दोन लाख २४ हजारांचा ऐवज जप्त केला. त्यापाठोपाठ शकील याच्याकडून २ वायफाय राऊटर, ५५ सिम कार्ड, ५ सिम स्लॉट बॉक्स आणि लॅपटॉप असा तीन लाख ७५ हजारांची सामुग्री जप्त केली. मोहंमद हलीम याच्याकडून २ वायफाय राऊटर, ४ युएसबी वायर, दोन चार्जर, ५९ सिम कार्ड आणि ३ सिम स्लॉट बॉक्स असा दोन लाख चार हजारांचा ऐवज जप्त केला. तर पसार झालेल्या वसीलउल्ला याच्या घरातून १७ वायफाय राऊटर, ९६ एन्टीना केबल, वेगवेगळ्या कंपन्यांची १०२ सिम कार्ड आणि ८ सिम स्लॉट असा पाच लाख ९७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
या चौघांचेही शिक्षण दुसरी ते बारावी दरम्यान झालेले असून त्यांनी ‘कादर पॅलेस’ या इमारतीमधील आपल्या घरातच अनधिकृतरित्या टेलिफोन एक्सचेंज सुरू केले होते. परदेशातून येणारे आंतरराष्टÑीय व्हीओआयपी (व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) कॉलचे त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे भारतातील विविध मोबाइल कंपन्यांच्या सिमकार्डवर अनधिकृतरित्या रुट करून कंपन्यांची आणि केंद्र सरकारचा महसूल बुडवून फसवणूक करीत असल्याचे आढळले. त्यांच्याकडील टेलिफोन एक्सचेंजची सामुग्री आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड जप्त केली असून याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ कायदा तसेच इंडियन वायरलेस टेलिग्राफी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तिन्ही आरोपींना १८ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
-----------------------
अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजद्वारे थेट दुबईतील नातेवाईकांना मुंब्य्रातील रहिवाशी अल्पदरात फोन करीत असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. मात्र, यातून हवालाचे व्यवहार करणारे, अंडरवर्ल्ड गँगस्टर किंवा आंतकवाद्यांकडूनही वापर केल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या त्यादृष्टीनेही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
..........................
‘हॅलो गल्फ’सॉफ्टवेअर
या टेलिफोन एक्सचेंजचा उपयोग करण्यासाठी हॅलो गल्फ या सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता. त्यासाठी दुबईतील लोकांनी ते अॅप डाऊनलोड केले होते. त्यामुळे मुंब्य्रात ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन आणि फोरजी नेटवर्क नसलेलेही या एक्सचेंजमधून आंतरराष्टÑीय फोन करीत होते. त्याद्वारे केंद्राचा करोडो रुपयांचा महसूलही बुडाल्याची शक्यता आहे.