रेल्वे फाटकाला टेम्पोची धडक
By admin | Published: October 7, 2016 05:16 AM2016-10-07T05:16:17+5:302016-10-07T05:16:17+5:30
रेल्वे फाटक बंद होत असताना टेम्पोने त्याला धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३५ च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वेस्थानकात पूर्वेला घडली
रेल्वे फाटकाला टेम्पोची धडक
डोंबिवली : रेल्वे फाटक बंद होत असताना टेम्पोने त्याला धडक दिल्याची घटना गुरुवारी दुपारी २.३५ च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वेस्थानकात पूर्वेला घडली. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक १५ मिनिटे थांबवण्यात आली. सिग्नल यंत्रणेवरही त्याचा परिणाम झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने टेम्पोसह चालक सुरेश याला ताब्यात घेतले.
ठाकुर्लीत पूर्वेला रेल्वे फाटकानजीक तीन रस्ते एकत्र येत असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी वाहनांच्या रांगा लागतात. दररोज मर्यादेपेक्षा अधिक वेळ फाटक उघडे राहते. तसेच फाटक उघडे ठेवण्यासाठी वाहनचालकांनी रेल्वे कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याच्या घटना घडल्या आहेत. गुरुवारी दुपारी २.३५ च्या सुमारास फाटक बंद होत असताना सुरेश टेम्पो घेऊन घुसला. त्याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. फाटक टेम्पोच्या काचेवर आपटल्याने काच फुटली. फाटकही मोठ्या प्रमाणात वाकले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे तेथील अधिकारी अमित जैन यांनी सांगितले. सिग्नल यंत्रणा प्रभावित झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना वाहतुकीचे नियंत्रण करावे लागले. २.५० च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाकुर्लीतून पूर्व-पश्चिम ये-जा करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीलाही त्याचा फटका बसला. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी फाटकातून वाहने सोडण्याचे काम करत होते. या घटनेमुळे वाहनचालकांनी फाटक ओलांडण्याऐवजी डोंबिवलीतील मुख्य उड्डाणपुलाचा वापर करावा, अशी सूचनाही दक्ष नागरिकांनी केली. दरम्यान, सायंकाळपर्यंत तुटलेल्या फाटकाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
विविध ठिकाणच्या रेल्वे फाटकांमुळे दररोज मध्य रेल्वेच्या वाहतुकीला ४४ मिनिटांचा विलंब होतो. त्याला ठाकुर्ली, दिवा येथील फटकही कारणीभूत आहेत. ठाकुर्लीतील कोंडी फोडण्यासाठी केडीएमसीने तेथे उड्डाण पुलाचे काम सुरू केले आहे. मात्र, ते कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.