दोन वर्षांपूर्वीच्या खुनाचा छडा : ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेची कामगिरी
By जितेंद्र कालेकर | Published: July 30, 2018 10:55 PM2018-07-30T22:55:50+5:302018-07-30T23:01:29+5:30
दोन वर्षांपूर्वी शहापूरातील भारत धापटे यांचे अपहरण करुन त्यांचा खून झाला होता. कोणताही धागादोरा नसतांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार बाबू भगत शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
ठाणे : शहापूर तालुक्यातील आंब्याचापाडा, शिरोळ येथील भारत धापटे (४४) यांच्या खूनप्रकरणी सुनील गायकर (२८, रा. काळेपाडा, शहापूर) आणि महेश निमसे (२७, रा. कवडास) या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन वर्षांनी अटक केली आहे. या दोघांनाही न्यायालयाने ६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यातील मुख्य सूत्रधार बाबू भगत (शिवसेना आदिवासी आघाडीप्रमुख, शहापूर) हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भारत धापटे यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा दिनेश याने १२ सप्टेंबर २०१६ रोजी कसारा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २० जून २०१८ रोजी मध्य वैतरणा नदीच्या ब्रिजखाली भारत याचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या हाडांचा सांगाडा लोखंडी प्लेट आणि दगड बांधलेल्या अवस्थेत त्यांच्या मोटारसायकलसह मिळाला होता. त्यानंतर, याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वाढीव कलम दाखल करण्यात येऊन खुनाच्या तपासाचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या अधिपत्याखालील शहापूर युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. भारत धापटे आणि बाबू भगत यांच्यातील वादामुळे हा खून झाला असून सुनील गायकर, महेश निमसे आणि भगत यांनी त्यांच्या साथीदारांसह हे कृत्य केल्याचीही माहिती तपासात उघड झाली. सुनील आणि महेश हे दोघे शिरोळफाटा येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सापळा रचून २८ जुलै रोजी दोघांनाही अटक केली. चौकशीमध्ये त्यांनी या खुनाची कबुली दिल्याचे निगडे यांनी सांगितले. भारत हा २३ आॅगस्ट २०१६ रोजी आपल्या मोटारसायकलवरून भगतपाडा ते आंब्याचापाडा या मार्गाने जात होता. त्यावेळी भगत आणि त्याच्या साथीदारांनी त्याला मारहाण करूनच त्यांच्या जीपमध्ये जबरदस्तीने बसवले. त्याचे अपहरण करून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खूनही केला. त्यानंतर त्याच्या गळ्याला, कमरेला आणि पायाला व्यायामशाळेतील दोन लोखंडी प्लेट, दगडी जाते, मोठा दगड अशा वस्तू बांधून जीपनेच विहीगावजवळील मध्य वैतरणाच्या पुलावरून दुचाकीसह पाण्यात टाकली, अशी कबुली या दुकलीने पोलिसांना दिली. कालांतराने दोन वर्षांनी पाणी आटल्यानंतर वैतरणा नदीच्या ब्रिजखाली हा मृतदेह पोलिसांना मिळाला आणि या खुनाचा छडा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम, उपविभागीय अधिकारी दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निगडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक राजपूत हवालदार कशिवले, चौधरी, कडव, महाले, मुंढे आदींनी हा तपास केला.