नगरसेविकेची उत्साही वृक्षतोड सोसायटीला भोवली, निर्दयीपणे झाडांच्या फांद्या छाटल्याचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 03:45 AM2017-10-28T03:45:06+5:302017-10-28T03:45:15+5:30
ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने नियमाला अधीन राहून वृक्षछाटणीला परवानगी दिली होती.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने नियमाला अधीन राहून वृक्षछाटणीला परवानगी दिली होती; परंतु लोकपुरम सोसायटीत अत्यंत निर्दयीपणे झाडांच्या फांद्या छाटल्या गेल्या आणि दोन वृक्ष मुळासकट नष्ट करण्यात आले. या मनमानी वृक्षतोडीप्रकरणी पालिकेने सोसायटी सेक्रेटरीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका जयश्री डेव्हिड यांच्या पुढाकाराने ही वृक्षतोड झाल्याचे सांगितले जात असून त्याबाबत अभिनंदनाचे होर्डिंग्जही सोसायटीच्या आवारात शिवसेनेच्या वतीने लावण्यात आले होते. एकूणच नगरसेविकेच्या अतिउत्साहीपणामुळे आता सोसायटीच अडचणीत सापडली आहे.
येथील दी लोकपुरम को-आॅप. सोसायटी आणि लोकपुरम स्कूलच्या आवारातील काही वृक्षांच्या फांद्या त्रासदायक ठरत असल्याने त्या छाटण्याची परवानगी पालिकेकडे मागण्यात आली होती. पालिकेने वृक्षांची छाटणी करण्याबाबतच्या अटी आणि शर्ती सोसायटीला कळवल्या होत्या. त्यानुसारच शास्त्रोक्त पद्धतीने झाडांच्या फांद्या छाटाव्यात आणि वृक्षांचे जतन होईल, याची काळजी घ्यावी, अशा सूचना पालिकेने दिल्या होत्या.
मात्र, सोसायटीच्या आवारातील अशोकाच्या २० झाडांसह ३ रेन ट्री आणि २ सुबाभूळ अशा २५ झाडांच्या फांद्या सुमारे दीड महिन्यापूर्वी छाटण्यात आल्या होत्या. या वृक्षतोडीनंतर शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका जयश्री डेव्हिड यांच्या अभिनंदनाचे फलक सोसायटीत लावण्यात आले होते. त्यात सोसायटीतल्या जीर्ण झाडांची विल्हेवाट लावल्याबद्दल आणि अन्य समस्या दूर केल्याबद्दल अभिनंदन करणारा मजकूर या फलकावर होता.
झाडांच्या फांद्या अत्यंत निर्दयीपणे छाटण्यात आल्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिक मंदार साठे यांनी पालिकेकडे आॅनलाइन तक्र ार दाखल केली होती. त्यानंतर, वृक्ष अधिकाºयांनी केलेल्या चौकशीत वृक्षांच्या फांद्या अतिप्रमाणात तोडण्यात आल्या असून वृक्ष पर्णहीन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.
या वृक्षतोडीबाबतचा खुलासा करण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याबाबतचे समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबतचा अर्ज दिल्याची माहिती वृक्ष अधिकारी केदार पाटील यांनी दिली.
>आमची बाजू मांडू : १७ एकरवर विस्तारलेल्या लोकपुरममध्ये अनेक छोट्या सोसायट्या आहेत. वैयक्तिक सोसायटीपैकी कोणी किती झाडे तोडली, यावर आम्ही देखरेख ठेवू शकत नाही; परंतु अॅपेक्स बॉडी असल्यामुळे आम्हाला नोटीस आली आहे. नोटीस आल्यानंतर आम्हाला गांभीर्य समजले असले, तरी केवळ आम्हालाच नोटीस का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसेविकेच्या अभिनंदनाचे फलक केदार लोकपुरम या सोसायटीने लावले होते. मात्र, अॅपेक्स बॉडी म्हणून आमची दोन्ही बाजूने कोंडी होत आहे. पोलीस आणि पालिकेकडे आम्ही आमची बाजू मांडू.
- राजेश मटकरी, अध्यक्ष, लोकपुरम सोसायटी
झाडांच्या फांद्या या नियमानुसारच छाटण्यात आल्याचा दावा नगरसेविका जयश्री डेव्हिड यांनी केला आहे. लोकांच्या तक्र ारी आल्यानंतर सर्वच ठिकाणी अशा फांद्या छाटल्या जातात. त्यात चुकीचे केले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु, पालिकेच्या नोटीसबाबत काहीही माहीत नसल्याचेही त्यांनी सांगितले.