मनसेचे खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 02:38 AM2018-07-15T02:38:32+5:302018-07-15T02:38:35+5:30
एकीकडे खड्ड्यांनी कल्याणमध्ये पाचवा बळी घेतला असताना ठाण्यात त्याकडे अद्यापही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही.
ठाणे : एकीकडे खड्ड्यांनी कल्याणमध्ये पाचवा बळी घेतला असताना ठाण्यात त्याकडे अद्यापही पालिका प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळे हे खड्डे निदर्शनास आणून देण्यासाठी शुक्रवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने खड्ड्यात झोपून अनोखे आंदोलन केले. वेळेत हे खड्डे बुजवले गेले नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच या खड्ड्यांत टाकू, असा इशाराही यावेळी मनसेने दिला. दरम्यान, पोलिसांनी १४ पदाधिकाºयांना ताब्यात घेऊन सोडले.
शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बहुतांश ठिकाणी वाहन चालवणेदेखील नागरिकांना कठीण झाले आहे. प्रशासन वेळेत ते बुजवत नसल्याचा आरोप करून शुक्र वारी शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि मनसेचे पदाधिकारी महेश कदम यांनी कॅसल मिल परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनी खड्ड्यांत झोपून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शहरात ठिकठिकाणी खड्डे पडूनही पालिका प्रशासनाकडून ते बुजवण्यात येत नाही. अधिकारी केवळ आर्थिक गोष्टींमध्ये गुंतले असून त्यांना या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचा आरोप यावेळी महेश कदम यांनी केला.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, ठाणे महापालिकेच्या वतीने दरदिवशी रस्त्याला किती खड्डे पडले, कुठे पडले आहेत, याची आकडेवारी घेतली जाते. त्यानुसार, पडलेल्या खड्ड्यांवर तत्काळ मुलामासुद्धा लावला जात होता. परंतु, यंदा मात्र आजही शहरात त्यांचा साधा सर्व्हेही केलेला नाही. महापालिकेने सुरू केलेल्या स्टार ग्रेड अॅपची अद्याप ठाणेकरांना माहिती नसल्याने त्यावर केवळ खड्ड्यांच्या १४ तक्रारी मागील पाच दिवसांत प्राप्त झाल्या आहेत.