ठाण्यातील संगीत कट्टयावर भक्ती कोलाजच्या कार्यक्रमातून साकारली देवीची विविध रूपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 03:26 PM2018-10-06T15:26:21+5:302018-10-06T15:28:40+5:30
गेली वर्षभर संगीत कट्टयावर सातत्याने नवनवीन कार्यक्रम किरण नाकती यांच्या पुढाकाराने राबविले जातात.
ठाणे : संगीत कट्टयावर विजयनगर, अंधेरी मुंबई येथील माहिलांनी भक्ती कोलाज हा कार्यक्रम सादर करत रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात कर्पूरगौरा गौरी शंकरा,सर्प फणीवर,कायी कायी बोल,हेची दान देगा देवा हि गाणी सादर करण्यात आली.भक्तीचा निर्गुणाकडून-निर्गुणाकडे जाणारा प्रवास नृत्य व गाण्याच्या माध्यमातून उलघडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
"अनादी निर्गुण प्रकटली भवानी" हे गाणे सादर करत त्यावर उत्तम असे नृत्य देखील करण्यात आले.या गाण्याच्या माध्यमातून देवीची वेगवेगळी रूपे दाखवण्यात आली. वसुधा सोमण, अक्षता अंतरकर,संयोगीता काटदरे,मुग्ध आठल्ये, मनीषा केळकर, मृण्मयी बेडेकर,वैशाली काजरेकर,मंजिरी आगाशे इत्यादी कलाकारांनी यात काम केले. तसेच अमेय हर्डीकर याने तबला आणि राजन पित्रे याने साईड रिदम साठी साथ दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन निनाद बाचल यांनी केले तर दीपप्रज्वलन शरद भालेराव,प्रभावती भालेराव यांनी केले.यंदाचा हा २१ क्रं चा कट्टा होता. हा कार्यक्रम म्हणजे आम्हा प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे,संगीत कट्ट्यातर्फे असे कार्यक्रम नेहमी करत राहा असे एका जेष्ठ प्रेक्षकाने सांगितले. कोणत्याहि कामातुन आपल्याला समाधान शोधता आले पाहिजे,संगीत कट्ट्याच्या माध्यमातून जर लोकांना समाधान मिळत असेल आणि आपण सर्व टेन्शन विसरून कार्यक्रम जगत असाल तर आमच्यासाठी हि अभिमानाची बाब आहे असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले.