वसईत रंगला मराठी गझल मुशायरा

By admin | Published: April 19, 2016 01:38 AM2016-04-19T01:38:13+5:302016-04-19T01:38:13+5:30

येथे गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दवेल कलासाहित्य सांस्कृतिक परिषदेने १६ एप्रिल रोजी आयोजिलेला 'मराठी गझल मुशायरा' खूपच रंगला

Vasayet Rangela Marathi Ghazal Musayra | वसईत रंगला मराठी गझल मुशायरा

वसईत रंगला मराठी गझल मुशायरा

Next

वसई : येथे गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दवेल कलासाहित्य सांस्कृतिक परिषदेने १६ एप्रिल रोजी आयोजिलेला 'मराठी गझल मुशायरा' खूपच रंगला. महाराष्ट्रातील नामवंत शायरांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले. डॉ राम पंडीत, सदानंद डबीर, रमण रणदिवे, ज्योस्ना रजपुत, प्रमोद खराडे, ज्योती बालिगा राव यांनी आपल्या गजला सादर केल्या.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ पल्लवी बनसोडे यांनी सुरेश भटांच्या
'फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते, वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते' या शेराने सुरूवात करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
'अंतयात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे, धूळ ही रस्त्यातली त्या गायला लागेल रे,
तो कवी होता न साधा एक झंझावात तो, शब्द सांभाळून त्याचा न्यायला लागेल रे'
या सदानंद डबीर यांच्या सुरेश भटांवर लिहिलेल्या ओळींनी शब्दांची पालखी सजली आणि संपूर्ण वातावरण गझलमय झाले. मुशायरा उत्तरोत्तर रंगतच गेला. रमण रणदिवे यांच्या
'होकार आज देते, तेव्हा नकार होता. तो जीव घ्यावयाचा पहिला प्रकार होता ‘
अशा प्रत्येक शेराने रसिकांची मने जिंकून घेतली
'वादळाने आज थोडे शांत व्हाया पाहिजे, या मनाला सावराया वेळ द्याया पाहिजे'
या ज्योस्ना रजपूत यांच्या गझलेला रसिकांनी भरभरून दाद दिली, त्यांची
'बोलबाला वेदनांचा फार झाला भावनांचा केव्हढा व्यापार झाला'
ही गझल देखील रसिकांनी उचलून धरली तर प्रमोद खराडे यांच्या
'हे जसे होते तसे तू कर पुन्हा जीवनाचा रिक्त प्याला भर पुन्हा'
या गझलेलाही रसिकांनी दाद दिली.सदानंद डबीर यांच्या
'आसवे टाळतां आली पण हसतां आले नाही, मी नुसते सलाम म्हटले मज झुकतां आले नाही'
या गझलांनी मुशायरा बहारदार केला. गझलेच्या वषार्वात गझलप्रेमी चिंब भिजले. ज्योती बालिगा राव यांच्या सुत्रसंचालनाने बहार आणली. कार्यक्रमास वसईतील नामांकित, संगीतकार अच्युत ठाकुर, गायक नरेंद्र कोथंबीकर, प्राचार्य दुतोंडे सर, प्रा.उत्तम भगत, प्रा.आत्माराम गोडबोले, प्रा प्रदिप पाटील, प्रा विभुते, जयंत बर्वे, संदीप राऊत, सुरेश वर्तक, कवी नंदन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ कवयित्री वैजयंतीमाला मदने यांच्या समारोपीय सुंदर भाषणाने कार्यक्रमाची सांगतां झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Vasayet Rangela Marathi Ghazal Musayra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.