ठाण्यात चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा पानटपरीचालक अटकेत
By जितेंद्र कालेकर | Published: October 3, 2018 10:46 PM2018-10-03T22:46:16+5:302018-10-03T22:52:14+5:30
आपल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार होऊनही केवळ अज्ञानापोटी कुठेही तक्रार न करणाऱ्या महिलेचे तिच्या नातेवाईकांनी समुपदेशन केल्यानंतर तिने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर सुहेल शेख या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : चॉकलेटचे आमिष दाखवून एका चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या कासारवडवली भागातील सुहेल शेख (३७, रा. कासारवडवली, मूळ रा. उत्तर प्रदेश) या पानटपरीचालकाला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. मंगळवारी या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये ब्रह्मांड परिसरातून त्याला जेरबंद करण्यात आले.
कासारवडवली भागात राहणाºया या चिमुरडीला २८ सप्टेंबर रोजी सुहेल याने दुपारी चॉकलेटचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेले. या मुलीशी तो गैरवर्तन करत असतानाच तिने रडण्यास सुरुवात केली. हा आवाज ऐकून मुलीच्या आईने तिकडे धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघड झाला. मूळची पश्चिम बंगाल भागात राहणारी मुलीची आई अशिक्षित असल्यामुळे तिला कायद्याचे पुरेसे ज्ञान नाही. त्यामुळे तिने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली नव्हती. कालांतराने काही नातेवाइकांनी सल्ला दिल्यानंतर तिने २ आॅक्टोबर रोजी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले, निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले यांच्या पथकाने शेखला ब्रह्मांड परिसरातून बुधवारी सायंकाळी जेरबंद केले. सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले अधिक तपास करत आहेत.
.....................