ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांना कृतार्थ सन्मान पुरस्कार जाहीर , ज्येष्ठ रत्न, सेवारत्न पुरस्कारांचेही होणार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 04:07 PM2018-03-04T16:07:03+5:302018-03-04T16:07:03+5:30
मंगळवारी ज्येष्ठ महोत्सव आयोजित करण्यात आला असून उत्साह, जल्लोषाची ‘रंगतदार’ पंचमी या महोत्सवात साजरी होणार आहे.
ठाणे : यंदाचा ज्येष्ठ महोत्सव मंगळवार 6 मार्च रोजी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे साजरा होणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी जल्लोष आणि आनंदाची उधळण करीत ज्येष्ठांचा आनंद द्विगुणीत करणार, असा विश्वास व्यास क्रिएशन्स्चे संचालक नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केला. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच उल्लेखनिय कार्य करणार्या ज्येष्ठांना सेवारत्न, ज्येष्ठ रत्न आणि दांपत्य पुरस्कारांचेही वितरण होईल.
ज्येष्ठांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान करण्यासाठी आणि ज्येष्ठ म्हणजे आपल्या संस्कृतीचा अनुभव संपन्न ठेवा ही जाणीव वाढीस लागावी यासाठी व्यास क्रिएशन्स्तर्फे प्रतिवर्षी ज्येष्ठ महोत्सवाचे आयोजन केले जाते. नावीन्याचा ध्यास घेऊन सृजनशीलता जपणारी व्यास क्रिएशन्स् संस्था प्रकाशन आणि समारंभ या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे.यावेळी नामवंत डॉक्टर्स व वैद्यांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी आरोग्य व अध्यात्म याविषयावर सुसंवाद, मान्यवरांची व्याख्याने, मनोरंजनाचे कार्यक्रम, पुस्तक भेट, अल्पोपहार, जेवण... आदिंची रेलचेल असेल. खास ज्येष्ठांसाठी प्रकाशित होणार्या ‘ज्येष्ठविश्व’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन, महिला दिनानिमित्त ‘तेजस्विनी’ विशेषांकाचे यावेळी प्रकाशन होईल. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, नाट्य सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, अभिनेत्री वर्षा धांदळे आणि ज्येष्ठ रंगकर्मी रागिणी सामंत, तेजस्विनी अंकाच्या अतिथी संपादिका आकाशवाणी अस्मिता वाहिनीच्या कार्यक्रम प्रमुख उमा दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, आरोग्यम् मासिकाच्या संपादिका वैद्य सुचित्रा कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर, ज्येष्ठ नाटककार शशिकांत कोनकर, फेसकॉमचे अध्यक्ष द. तु. चौधरी, मधुकरराव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. आपले संपूर्ण आयुष्य एका ध्येयासाठी व्यतीत करणार्या महनीय व्यक्तीस कृतार्थ जीवन सन्मान पुरस्कार व्यास क्रिएशन्स्च्या वतीने दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठांच्या आयुष्याची सायंकाळ आनंदात, उत्साहात आणि विचारांची उधळण करीत जावी यासाठी व्यास क्रिएशन्स् प्रयत्नशील असते. या महोत्सवासाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे आणि आमचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन व्यास क्रिएशन्स्ने केले आहे. महोत्सवासाठी नावनोंदणी आवश्यक असून इच्छुकांनी 022-25447038 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात येत आहे.