आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:42 AM2018-01-15T00:42:47+5:302018-01-15T00:42:55+5:30
कर्जाचे आमिष दाखवून मुलुंड येथील तरुणीची ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया ठाण्यातील आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
ठाणे : कर्जाचे आमिष दाखवून मुलुंड येथील तरुणीची ५० हजार रुपयांनी फसवणूक करणाºया ठाण्यातील आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
शैलेश हरिश्चंद्र साळवी आरोपीचे नाव असून तो कोलशेत रोडवरील मनोरमानगरातील श्रुती गार्डन सोसायटीचा रहिवासी आहे. मुलुंड येथील अमरनगर दर्गा रोडजवळ राहणाºया एका २५ वर्षीय तरुणीला त्याने कर्जाचे आमिष दाखवले होते. पीडित तरुणीला कर्जाची गरज असल्याने तिने आरोपीवर विश्वास ठेवला.
२४ जून ते ११ सप्टेंबर २०१७ या काळात आरोपीने तरुणीकडून ४६ हजार १०० रुपये वसूल केले. या पैशांची गुंतवणूक केल्यास कर्ज मिळेल, असे आमिष आरोपीने तिला दाखवले होते. गुंतवणूक केलेल्या पैशांवर ठरावीक मुदतीवर विशिष्ट रकमेचा परतावा मिळेल, असेही आमिष त्याने दाखवले होते.
त्यानुसार, ठरावीक मुदतीनंतर तरुणीला १६ हजार १०० रुपयांचा परतावा मिळणे अपेक्षित होते. मात्र, बरेच महिने निघून गेले तरी रकमेचा परतावा किंवा कर्जही मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणीला समजले.
तिने शनिवारी याप्रकरणी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, शैलेश साळवी याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू झाला आहे.