असंख्य चित्रपटांतून विजू मामांनी महाराष्ट्राला पोट धरून हसवलंय : किरण नाकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:09 PM2018-09-03T16:09:55+5:302018-09-03T16:11:59+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर आठवण विजू मामांची... या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
ठाणे : विजय चव्हाण यांनी अजरामर केलेल्या असंख्य भूमिका त्यांच्यातील एका जबरदस्त अभिनेत्याची ओळख करून देतात. तू तू मी मी, श्रीमंत दामोदर पंत ,मोरूची मावशी अशा कित्येक नाटकांतून आपल्या व्यक्तीरेखेची छाप रसिकांवर सोडली. मोरूच्या मावशीने तर लोकांना अक्षरशः वेड लावले. माहेरची साडी, पछाडलेला, गोतावळा, झपाटलेला, भरत आला परत, जत्रा अशा असंख्य चित्रपटांतून विजू मामांनी महाराष्ट्राला पोट धरून हसवलंय. असा टायमिंगचा बादशाह होणे नाही असे मत किरण नाकती यांनी अभिनय कट्ट्यावर व्यक्त केले.
या दिग्गज अभिनेत्याला मानाचा मुजरा करण्यासाठी अभिनय कट्टा सरसावला व कट्टा क्र ३९२ म्हणजेच आठवण विजू मामांची या कट्ट्याला सुरवात झाली. सुप्रसिद्ध जेष्ठ विनोदी नाट्य चित्रपट अभेनेते विजय चव्हाण यांचे नुकतेच दीर्घशा आजाराने निधन झाले. विजय चव्हाण म्हणजेच रंगभूमी व चित्रपट सृष्टीचे लाडके विजू मामा. महान अभिनेत्या प्रमाणेच विजू मामा महान व्यक्ती होते . अतिशय साधी राहणीमान व आपल्या सर्वच सहकलाकारांसोबत मग तो ज्येष्ठ कलाकार असो किंवा आजच्या तरुण पिढीतला असो सर्वांसोबत मामा नम्रपणे वागत. मिश्किल स्वभाव व दिलदार व्यक्तिमत्व अशी त्यांची ख्याती होती असेही नाकती पुढे म्हणाले. श्रीमंत दामोदर पंत व मोरूची मावशी या दोन्ही नाटकातील निवडक नाट्यप्रवेश अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केले. श्रीमंत दामोदर पंत मध्ये सहदेव कोळंबकर, परेश दळवी, मौसमी घाणेकर यांनी काम केले. तसेच मोरूची मावशीच्या सादरीकरणामध्ये सुरज परब, वैभव चव्हाण, कुंदन भोसले, ओमकार मराठे, रोहिणी थोरात, साक्षी महाडिक सहदेव साळकर या कट्टयाच्या कलाकारांनी सहभाग घेतला. विजू मामांच्या कलाकृतीमधून अभिनय कट्टयातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. विजय चव्हाण यांचे चिरंजीव वरद चव्हाण यांना चित्रीकरणामुळे हजेरी लावता आली नाही. परंतु त्यांनी त्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. बाबांना नेहमी हसायला व समोरच्याला हसत ठेवायला आवडायचं म्हणूनच आपण अभिनय कट्टयाच्या माध्यमातून जे करताय ती खरी बाबांना श्रद्धांजली आहे असं बोलून त्यांनी अभिनय कट्टयाचे आभार मानले. या कार्यक्रमासोबतच अभिनय कट्ट्यावर “कार्टी नाटकात घुसली” या नवीन नाटकाचा परिसंवाद पार पडला. एकूण नऊ इरसाल विनोदी तरुण कलाकारांना घेऊन कौतुक शिरोडकर यांच्या फार्सिकल लेखणीतून व मछिंद्र कदम या नव्या दमाच्या होतकरू दिग्दर्शनाकातून अभिनय कट्ट्याचा कलाकार गणेश गायकवाड याची महत्वपूर्ण भूमिका असलेल्या या नाटकाचा एक विनोदी नाट्य प्रवेश कट्ट्यावर सादर केला व उपस्थित रसिकांनी विनोदाचा आस्वाद घेतला. मनोज चाळके, प्रवीण आंग्रे, गणेश गायकवाड, चेतन गडकरी, तेजस घाडीगावकर, कृष्णा दळवी, प्रशांत मनोरे, हर्षद शेटे, रविना भायदे या सर्वच कलाकारांनी बँकेतील कर्मचाऱ्याचे नाटक बसवतानाची धडपड गोंधळ व त्यातून होणार विनोद व एका हौशी कलाकाराची व्यथा मांडण्याचा चांगला प्रयत्न केलाय. असं त्या सादरीकरणातून व परिसंवादातून लक्षात आले. या कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.