पाण्यासाठी भटकंती : साडेसात कोटींची पाणी योजना कोरडीच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:55 AM2019-02-05T03:55:02+5:302019-02-05T03:55:12+5:30

ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांतील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपये मंजूर असून त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे.

water scarcity in Thane | पाण्यासाठी भटकंती : साडेसात कोटींची पाणी योजना कोरडीच

पाण्यासाठी भटकंती : साडेसात कोटींची पाणी योजना कोरडीच

googlenewsNext

- सुरेश लोखंडे

ठाणे  - ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांतील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी सुमारे साडेसात कोटी रुपये मंजूर असून त्याद्वारे पाणीटंचाईवर मात करणे सहज शक्य आहे; मात्र जिल्हा प्रशासनासह जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणामुळे डोंगराळ, दुर्गम भागांत महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव शहापूर तालुक्यातील आदिवासी गावपाड्यांत दिसून येत आहे.
ठाणे, मुंबईच्या महानगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यात नोव्हेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. या समस्येकडे ‘लोकमत’ने प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधले. त्यानुसार, हालचालीही सुरू झाल्या; मात्र ठोस उपाययोजना प्रशासनाने केल्या नाही. याशिवाय, बोअरवेलची कामेदेखील निविदेच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. आमदार पांडुरंग बरोरा यांनी पाणीटंचाईचा आढावा घेऊन अधिकाºयांना कारवाईच्या सूचना नेहमीप्रमाणे दिल्या. रविवारी शहापूरच्या दुर्गम भागांत फेरफटका मारला असता, ग्रामस्थ जीवघेण्या पाणीटंचाईला तोंड देत असल्याचे वास्तव दिसून आले.

शहापूर तालुक्यासाठी सुमारे तीन कोटी ८२ लाख रुपयांचा कृती आराखडा मंजूर असला, तरी तो सध्या कागदावरच आहे. शहापूर तालुक्याच्या १२१ गावांसह ३०३ पाड्यांमध्ये पाणीटंचाईवरील उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पण, त्याही अद्याप कागदावरच रेंगाळत आहेत. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे टाकीपठार, डोळखांबच्या पठारावरील गावे, तलवाडा ग्रामपंचायतीची गावे, चिंचवाडी, कोठारे, कळगोंडे आदी गाव परिसरांत तीव्र टंचाईला ग्रामस्थ तोंड देत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ भागरत यांनी सांगितले.

याप्रमाणेच कवठेपाडा, कुंडाचीवाडी, रिकामवाडी, आवळे, जांभूळपाडा, साखरबाव, दलालपाडा, ठुणे खुर्द, सिंधीपाडा, किन्हवलीजवळील कानवे, जरोली, खरांगण, शोगाव, धोंडाळपाडा, धानकेपाडा, सावरोली, नांदगाव आदी गावपाडे टंचाईने त्रस्त असल्याचे ग्रामस्थ भगवान दवणे यांनी सांगितले. याशिवाय, डोळखांब भागातील सावरपाडा, निभाळपाडा, सुखांडे, डोहले, देहने, वरपडी, पाचघर, रसाळपाडा, नेटवाडी, उंबाचापाडा, खरीवली, नडगाव आदी पाड्यांमध्येही भीषण स्थिती असल्याचे ठुणे येथील दवणे यांनी सांगितले. शेंद्रुणजवळील निचितेपाडा, पष्टे, भटपाडा, निपुर्ते, टेंभा आदींसह डोळखांबजवळील तोरणपाडा, चांदीचापाडा आदी गावखेडे तीव्र पाणीटंचाईने त्रस्त आहेत. या गावांमधील महिला, मुलींसह ग्रामस्थ पाण्याच्या शोधात रानावनांत फिरत आहेत.
पायवाटेने अनवाणी फिरत असलेल्या या महिला जंगलातील पाणवठ्यांच्या डबक्यातून पाणी भरतात. विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. तासन्तास बसून विहिरींमध्ये साठलेले पाणी त्यांना काढावे लागते. जिल्ह्यातील १९५ गावे आणि ५७२ आदिवासी, दुर्गम भागांतील पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवणार असल्याची पूर्वकल्पना असतानाही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शहापूर तालुक्यातील असूनही त्यांचेदेखील या आदिवासी, ग्रामीण, दुर्गम भागांतील पाड्यांच्या टंचाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दवणे यांनी सांगितले.
पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने सात कोटी ४२ लाख रुपयांच्या कामांचे नियोजन केले आहे. त्याद्वारे विहिरी खोल करण्यासह टँकर-बैलगाडीने पाणीपुरवठा, नळपाणीपुरवठ्याची दुरुस्ती, पूरक योजना, नवीन विंधन विहिरी आदींची कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. दरवर्षी कोट्यवधी खर्चूनही उन्हाळ्यात पाणीसमस्या उद्भवत आहे. गेल्या वर्षी १२१ मोठी गावे आणि ३२७ पाड्यांनी पाणीसमस्येला तोंड दिले. यंदाही १९५ गावे आणि ५७२ पाडे पाणीटंचाईच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.
पाणीटंचाईला सामोरे जाणारे ८८ गावे आणि २३० पाड्यांना एक कोटी ३५ लाख रुपये खर्चून टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचेही नियोजन आहे. पण, त्यानुसार अजूनही पाणीपुरवठ्याची कामे सुरू नाहीत. यामध्ये शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ६५ गावे, १८३ पाड्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एक कोटी पाच लाखांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. याखालोखाल मुरबाड तालुक्यातील १८ गावे व ३३ पाड्यांना टँकर किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा होईल, त्यावर २१ लाख ७६ हजार रुपये खर्च होतील. याशिवाय, भिवंडीला तीन गावे, सहा पाडे आणि अंबरनाथला दोन गावे, आठ पाड्यांना टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा होईल. नियोजनात कमतरता नसली, तरी ही सर्व कामे प्रत्यक्षात होत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

मुरबाड तालुक्यातील तोंडली, सासणे, म्हाडस, भुवन, वज्रेचीवाडी, पाटगाव, वाल्हीवरे या गावांप्रमाणेच धसई परिसरातील खिरवाडी, दांडवाडी, मोखवाडी, तावरेवाडी या पाड्यांमधील ग्रामस्थ पाणीटंचाईने त्रस्त आहेत. याशिवाय, टोकावडे परिसरातील जंगलपट्ट्यात वाघवाडी, उंबरवाडी, आवळ्याचीवाडी, फांगणे, खदगी, फांगूळ, गव्हाण, भूतांडडोह इत्यादी ठिकाणचे ग्रामस्थ पाणीसमस्येने मेटाकुटीला आले आहेत.

विहिरी खोल करण्यासाठी १८ लाखांची तरतूद आहे. यातून शहापूरच्या ३० गावांसह ६३ पाड्यांच्या विहिरी खोल केल्या जातील. नळपाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी दोन कोटी २२ लाखांची तरतूद आहे. यातून शहापूरची सहा गावे, सहा पाड्यांसाठी एक कोटी ५४ लाखांच्या खर्चाचे नियोजन आहे.

मुरबाडमधील पाच गावे आणि एक पाड्यासाठी ५८ लाख रुपये मंजूर आहेत. चार गावे आणि दोन पाड्यांसाठी पूरक पाणीपुरवठा योजनेचे नियोजन असून त्यासाठी एक कोटी ६८ लाखांचा खर्च अपेक्षित केले. नवीन विंधन विहिरीसाठी एक कोटी ९८ लाखांचा खर्च निश्चित केला आहे.

त्यातून ६२ गावे आणि २३९ पाड्यांसाठी विंधन विहिरींची (बोअरवेल) व्यवस्था करण्याचे निश्चित आहे. यापैकी मुरबाड तालुक्यामधील २० गावे, ४४ पाड्यांसाठी सर्वाधिक ३८ लाख ४० हजारांचे नियोजन, तर शहापूरच्या १८ गावांसह ५० पाड्यांवर ४० लाख ८० हजार रुपये खर्चाचे नियोजन आहे.
 

Web Title: water scarcity in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.