भारतातून ब्रिटिश गेले; पण इंग्रजाळलेपणा कायम- डॉ. सदानंद मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:10 AM2018-07-23T03:10:32+5:302018-07-23T03:11:01+5:30
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ बंगाली चरित्राचे चारु शीला धर यांनी केलेल्या संक्षिप्त रूपांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी सहयोग मंदिर येथे पार पडले.
ठाणे : वंदे मातरम आणि आनंदमठ यामुळे डॉ. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे महाराष्ट्राला परिचित होतेच. मात्र आता श्रीकृष्ण चरित्रामुळेही त्यांचा परिचय महाराष्ट्राला होणार आहे, असा विश्वास अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी ठाण्यात व्यक्त केला.
परम मित्र प्रकाशनतर्फे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या मूळ बंगाली चरित्राचे चारु शीला धर यांनी केलेल्या संक्षिप्त रूपांतराच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मोरे यांच्या हस्ते शनिवारी सहयोग मंदिर येथे पार पडले. यावेळी डॉ. मोरे म्हणाले की, भारतात सर्वात आधी बंगालमध्ये इंग्रजांनी राज्य केले. त्यामुळे बंगालमध्ये एकीकडे ब्रिटिशांचा पराकोटीचा आदर करणारा आणि तिटकारा करणारा असे दोन प्रकारांचे बंगाली माणसे होती. बंकिमचंद्र हे देशभक्त होते आणि विद्यावान होते. त्यामुळे इंग्राजळलेल्या भारतीयांना आदर्श नायक देण्यासाठी त्यांनी श्रीकृष्ण चरित्राचे लेखन केले. भारतातून ब्रिटिश गेले तरी आपल्यातून इंग्रजाळलेलापणा गेला नाही, पाश्चात्यपणा देखील आपल्यातून गेलेला नाही. त्यामुळे आजही समाजाला श्रीकृष्ण चरित्राची गरज आहे. ब्रिटिशांच्या काळात हिंदू धर्माची निद्रिस्त अवस्था होती. त्यावेळी श्रीकृष्ण चरित्रांचा अभ्यास न करता पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणाऱ्या तत्कालीन बंगाली समाजाला आदर्श व्यक्ती देण्यासाठी डॉ. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी श्रीकृष्ण चरित्र लिहिले. त्यांनी लिहिलेल्या श्रीकृष्ण चरित्राचा मराठीत अनुवाद करून लेखिका चारु शीला धर यांनी त्यांचा महत्त्वाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला आहे. आपण माणूस म्हणून कृष्णाकडे पाहिले पाहिजे. आजची तरु णपिढी ही आस्तिक - नास्तिकमध्ये अडकली आहे. तरुणपिढी ही तंत्राकडे आकर्षित होत असली तरी ज्ञानाकडे मात्र आकर्षित होत नाही अशी खंत डॉ. अनघा मोडक यांनी व्यक्त केली.
आजच्या दहीहंडी उत्सवावर टीका करताना त्या म्हणाल्या की, दहीहंडी उत्सवाभोवती अर्थकारण, राजकारण, समाजकारण असल्याचे दिसून येते.