ड्रग माफियांवर कडक कारवाई करणार- विवेक फणसळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 09:11 PM2018-12-21T21:11:16+5:302018-12-21T21:21:32+5:30
ड्रग माफियांवर कारवाई करण्याबरोबरच युवकांमध्येही पोलिसांकडून व्यापक प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. व्यसनापासून दूर राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाणार असून महाविद्यालयांमध्ये एक कॉलेज एक पोलीस शिपाई ही योजनाही राबविली जाणार असल्याचे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितले.
ठाणे: युवकांना व्यसनी बनविण्यासाठी महाविद्यालय परिसरातच बऱ्याचदा ड्रग माफीया आपले जाळे पसरवितात. हे वारंवार उघड झाले. त्यामुळे अशा ड्रग माफियांवर कारवाई करण्याबरोबरच युवकांमध्येही पोलिसांकडून व्यापक प्रमाणावर जनजागृती केली जाणार आहे. कोणत्याही व्यसनापासून दूर रहावे, असा संदेश युवकांनीच संपूर्ण समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शुक्रवारी केले.
गेल्या एक आठवडाभरापासून ठाणे आणि भिवंडीतील दहा महाविद्यालयांमध्ये ‘स्टॉप ड्रग्ज’ हे अमली पदार्थ विरोधी अभियान ठाणे पोलिसांच्या वतीने राबविले गेले. यानिमित्त विविध स्पर्धाही या महाविद्यालयांमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ ठाण्याच्या ‘टीप टॉप प्लाझा’ येथील सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या नृत्य किंवा इतर स्पर्धांमधील काही स्टेप्स तुमच्या जशा लक्षात राहतील. त्याप्रमाणेच यातून या विद्यार्थ्यांनी दिलेला संदेश लक्षात राहणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर जे दुष्परिणाम होतात. यात केवळ त्याचे कुटूंबच नाहीतर समाजही भरडला जातो. नशेचे ‘उडान’ केल्यास त्याचे लॅन्डींग मात्र बरबादीकडेच आहे. त्यापेक्षा शिक्षण, नोकरी व्यवसायात यश मिळवून यशाचे उडाण करा, असा कानमंत्रही त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. केवळ एखाद्या सप्ताहापुरते हे अभियान नसावे ते युवकांनी यापुढेही चालू ठेवल्यास एक चांगली निव्यर्सनी पिढी तयार होईल. आंतरराष्टÑीय स्तरावरही या पिढीची यशस्वी कामगिरी होईल. महाविद्यालयांनी अमली पदार्थ विरोधी अभियानात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन यापुढे प्रत्येक महाविद्यालयाची एका पोलीस शिपायावर जबाबदारी सोपविली जाईल. अमली पदार्थविरोधी मोहीमेवर या शिपायाकडून करडी नजर राहील. त्यातून विद्यार्थ्यांना भेडसावणा-या अडचणी या पोलिसामार्फत सोडविण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही यावेळी फणसळकर यांनी दिली.
यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, प्रविण पवार, केशव पाटील, पोलीस उपायुक्त डॉ.डी. एस. स्वामी, अविनाश अंबुरे, अमित काळे, सहायक पोलीस आयुक्त मुकूंद हातोटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि उपनिरीक्षक कल्याणी पाटील यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते.
..............................
या अमली पदार्थ विरोधी अभियानात ठाण्यातील १० महाविद्यालयांमधील १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याचे पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी सांगितले.
...................
यावेळी रांगोळी स्पर्धेत भाविशा म्हात्रे (बीएनएन, कॉलेज, भिवंडी), घोषवाक्य - जुही पाटील (वसंत विहार, ज्यु. कॉलेज, ठाणे), पोस्टर पेंटींग- आर्यन गारिवाले, सेंट झेव्हीयर्स ज्यु. कॉलेज, मानपाडा, ठाणे, वक्तृत्व स्पर्धेत निशा यादव, स्वयंसिद्धी कॉलेज, ठाणे आणि समुह नृत्य स्पर्धेत गार्गी आणि गृ्रप, वसंत विहार कॉलेज ठाणे यांनी पाहरतोषिक पटकवली. सर्व विजेत्या विद्यार्थी आणि शिक्षकांना पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
.............................