महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह अन्य दोघांना ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 01:09 AM2018-02-04T01:09:09+5:302018-02-04T01:09:20+5:30
मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून त्यांची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या, प्रख्यात महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह अन्य दोघांना शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
ठाणे : मोबाइल नंबरचा सीडीआर (कॉल्सचा तपशील) बेकायदेशीरपणे मिळवून त्यांची विक्री केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या, प्रख्यात महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह अन्य दोघांना शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या वेळी चौकशी आणि तपासाकरिता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.
शुक्रवारी रात्री ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर, त्यांच्या मुंबईतील शिवाजी पार्कयेथील घरामधून लॅपटॉप, सीडी आणि डायरी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला, तसेच पोलिसांच्या तपासात या प्रकरणामध्ये इन्शुरन्स कंपन्यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणात पोलीस, इन्कम टॅक्स आणि नार्कोटिक्स विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉ एन्फोर्समेंट एजन्सीद्वारे अधिकृतपणे मोबाइल सीडीआर काढता येतो. या प्रकरणात ४ बड्या इन्शुरन्स कंपन्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पंडित यांच्यासह संतोष पडांगळे आणि प्रशांत सोनावणे या दोघांनाही अटक केली आहे. त्यामुळे बेकायदेशीर सीडीआर प्रकरणी अटकेत असलेल्या कथित आरोपींची संख्या ७ झाली आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांचे पथक अधिक तपास करत आहे.