ठाण्यात लोकमान्यनगरमध्ये तलवारीच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 11:36 PM2017-11-06T23:36:15+5:302017-11-06T23:36:50+5:30
पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास लोकमान्यनगर परिसरात घडली. यात तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) या तरुणाचा मृत्यू झाला असून अजय सिंग (२४ ) हा गंभीर जखमी झाला आहे.
ठाणे: पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने दोघा तरुणांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास लोकमान्यनगर परिसरात घडली. यात तरसेम सिंग उर्फ बॉबी (२५) या तरुणाचा मृत्यू झाला असून अजय सिंग (२४ ) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोकमान्यनगर पोलीस चौकी समोरच ही घटना घडली. घटनेच्या वेळी एकही पोलीस तिथे नसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
लोकमान्यनगर परिसरात राहणा-या या दोन गटात जुना वाद होता. याच वादातून चौघा जणांनी तलवारीने तरसेम आणि अजय या दोघा तरुणांवर सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यावेळी हल्लेखोरांनी दोघांच्या पोटात तलवारी घुसविल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान, तरसेम याला उपचारासाठी नेले जात असतांनाच त्याचा मृत्यू झाला. तर अजय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा हल्ला नव्यानेच बांधण्यात आलेल्या लोकमान्यनगर पोलीस चौकी समोरच झाला. नेमकी हल्ल्याच्या वेळी तिथे एकही पोलीस हजर नव्हता. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले आहेत. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
''हा काही मित्रांच्या गटातील आपसातील वाद आहे. तिवारी नामक व्यक्तिसह तिघांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मारेक-यांची माहिती मिळाली आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल.''
- सुनिल लोखंडे, उपायुक्त, वागळे इस्टेट विभाग, ठाणे