आयफोनच्या किंमतीएवढ्याच खर्चात परदेश दौरा शक्य आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 07:20 PM2017-09-27T19:20:30+5:302017-09-27T19:27:23+5:30
खरं तर गॅजेट आणि ट्रीप यांचा एकमेकांशी संबंध नाहीये. बाजारात येणारे फोन किंवा नवीन गॅजेट घेताना आपण खर्चाचा विचार करत नाही. मग आपल्या शरीर-मनाला शांती देणारा अनुभव घेतानाच किंमतीचा विचार का? म्हणूनच आयफोनच्या किमतीशी तुलना करु न वेगवेगळ्या पर्यटनस्थळांची ही माहिती परदेश दौरेही कसे परवडू शकतात हे सांगतात.
- अमृता कदम
अनेकजण बजेटच्या भीतीनं आपल्या फिरण्याचे प्लॅन रद्द करतात किंवा मग जवळच कुठे तरी जाऊ असं म्हणून तडजोड करतात. पण अशी तडजोड करण्यापूर्वी एकदा विचार करा. कारण ज्या किंमतीला आयफोन एक्स येतो त्या किंवा त्याहीपेक्षा कमी किंमतीत फिरता येईल अशीही अनेक ठिकाणं आहेत.टेक्नॉलॉजीच्या मोहातून बाहेर पडून एखादा सुंदर अनुभव आयुष्यात कमवायचा असेल तर या ठिकाणांची माहिती असायलाच हवी.
1.
सेशेल्स
हा देश म्हणजे हिंदी महासागरातला 115 बेटांचा समूह आहे. या बेटांपैकी काही बेटं ही नितांत सुंदर असून पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहेत. निवांत बीचेस, रंगीेबिरंगी प्रवाळं आणि सर्वत्र हिरवळ हे इथल्या सौंदर्याचं विशेष.
सेशेल्स बेटं तुम्हाला तुमच्या धकाधकीपासून दूर घेऊन जातात. जगातल्या उत्तम रीसॉर्टसपैकी काही रीसॉर्ट आणि स्कूबा डायव्हिंगसाठीही सेशेल्स प्रसिद्ध आहे. याच कारणांमुळे सध्या भारतीय पर्यटक हनीमून डेस्टिनेशन म्हणूनही सेशेल्सला पसंती देतात. आता सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च. भारतातून सेशेल्ससाठीची वेगवेगळी पॅकेजेस चाळीस हजार रूपयांपासून सुरु होतात. म्हणजेच आयफोन एक्सच्या अवघ्या निम्म्या किंमतीत सेशेल्सची सैर होऊ शकते.
2. श्रीलंका
भारतीय पर्यटकांसाठी श्रीलंका हेसुद्धा उत्तम बजेट डेस्टिनेशन आहे. एखाद्या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी पर्यटकांना जे काही लागतं, ते सगळं काही या छोट्याशा देशांत पहायला मिळतं. स्वच्छ आणि सुंदर बीचेस, जंगलं आणि विविध जागतिक वारसास्थळं. श्रीलंकन जेवणाची चवही पर्यटकांना चांगलीच भावते. भारतातून श्रीलंकेला जाण्याचा विमान खर्च कमीत कमी चौदा हजार रूपयांपर्यंत आहे. शिवाय इथे राहण्या-खाण्याचा खर्चही सहा हजार रु पये इतकाच होतो.
3. नेपाळ
हिमालयाच्या कुशीतल्या या छोट्याशा देशाला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे. बर्फाच्छादित शिखरं, सुंदर मंदिरं, बौद्ध विहार आणि छोटीछोटी गावं. भारतातून नेपाळला जाण्यासाठी पासपोर्टचीही गरजही नाही. त्यामुळे हे भारतीय पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. नेपाळसाठीचे टूर पॅकेजेसचे दर 40.000 रूपयांपासून सुरु होतात. म्हणजे पुन्हा एकदा आयफोनच्या निम्म्या किमतीतच.
4. इस्तंबुल
तुम्ही जर बजेटमध्ये असलेल्या तरीही हटके ठिकाणाच्या शोधात असाल तर तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुल उत्तम ठिकाण आहे. भारतातून इस्तंबुलच्या प्रवासाचा खर्च अवघा तीस हजार रूपये इतका आहे. युरोपियन आणि इस्लामिक संस्कृतीचं मिश्रण इस्तंबुलमध्ये पाहायला मिळतं. बीचेस, वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेल्या मशिदी आणि मिनार हे इस्तंबुलचं खास वैशिष्ट्य.
5. बँकॉक
बँकॉक-पट्टाया हे तसंही भारतीय पर्यटकांचं लाडकं ठिकाण आहे. बँकॉकच्या राऊण्ड ट्रीपचा खर्च तीस हजार रूपये आहे. बँकॉक उत्तम शॉपिंग डेस्टिनेशन तर आहेच, पण त्याचबरोबर निसर्गसौंदर्य, बौद्ध विहारं इथे आहेतच. पण त्याचबरोबर बँकॉक नाइटक्लबसाठीही प्रसिद्ध आहे.
6. बाली
बाली बेटांवर घालवलेला आठवडा तुमच्या अकाऊण्टवर फक्त साठ हजार रु पयांचाच भार टाकेल. बाली बेटांवर निसर्गानं सौंदर्याची जी उधळण केली आहे, त्यामुळे या बेटाला पाचूचं बेट किंवा देवाचं बेट म्हणूनही ओळखलं जातं. सोनेरी वाळूच्या समुद्रकिना-याना हिरवाईची झालर, लांबवर पसरलेली भातशेतं, ज्वालामुखीय पर्वतरांगा आणि प्राचीन वास्तू. बजेटमध्ये बसणारी ट्रीप तुम्हाला नक्कीच अवर्णनीय आनंद देईल.
खरं तर गॅजेट आणि ट्रीप यांचा एकमेकांशी संबंध नाहीये. बाजारात येणारे फोन किंवा नवीन गॅजेट घेताना आपण खर्चाचा विचार करत नाही. मग आपल्या शरीर-मनाला शांती देणारा अनुभव घेतानाच किंमतीचा विचार का? म्हणूनच आयफोनच्या किमतीशी तुलना करु न वेगवेगळ्या पर्यटनस्थळांची माहिती देण्याचा हा प्रयत्न.