बाइक रायडिंगचं पॅशन स्वस्थ बसू देत नाही मग ही नऊ ठिकाणं आहेत की त्यातून एक निवडा!
By admin | Published: May 12, 2017 06:50 PM2017-05-12T18:50:36+5:302017-05-12T18:50:36+5:30
प्रवासात भन्नाट अनुभव देणारे अनेक रस्ते भारतात आहेत जे बाइकवरून करायच्या प्रवासासाठीच प्रसिद्ध आहेत.
-अमृता कदम
बाइक म्हणजे प्रवासाचं एक साधन असं तुम्हा-आम्हाला वाटत असलं तरी अनेक जणांसाठी बाइक चालवणं ही पॅशन असते, त्यांचा छंद असतो. त्यामुळेच असे थ्रीलवेडे बाइकर्स गाडीला किक मारु न अगदी लांबच्या प्रवासाला जायला सज्ज असतात. प्रवासात भन्नाट अनुभव देणारे अनेक रस्ते भारतात आहेत जे बाइकवरून करायच्या प्रवासासाठीच प्रसिद्ध आहेत.
1. खार्दुंग ला ते लेह-लडाख
खार्दुंग ला हा सगळ्यात उंचावरचा मोटरेबल रोड आहे. एका बाजूला हिमालयाच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, त्यातून वळणं घेत जाणारा रस्ता...अॅडव्हेंचरसाठी तुम्हाला अजून काय हवंय? मनालीमधून बुलेटसारखी दमदार बाइक भाड्यानं घेऊन तुम्ही हा प्रवास करु शकता. या प्रवासात पहाडी, बौद्ध संस्कृतीच्या खुणाही जागोजागी दिसतात. एप्रिल पासून आॅगस्टपर्यंत तुम्ही केव्हाही या प्रवासाला जाऊ शकता. पण त्यानंतर बर्फवृष्टी सुरु व्हायला लागली की हा रस्ता बऱ्याचदा बंद असतो.
2. स्पिती व्हॅली
जर तुम्ही लेह-लडाख, हिमाचल प्रदेशला फिरायला निघालाच असाल, तर बाइकवरु न स्पिती व्हॅलीला जायला अजिबात विसरु नका. सतलज नदीला सोबत घेऊन प्रवास करताना काजा, टैबो, स्पिती आणि पीन व्हॅलीसारखी ठिकाणं तुम्हाला थांबायला भागच पाडतात. इथल्या बस्पा आणि किन्नौर भागात रस्त्याच्या कडेनं सफरचंद आणि जर्दाळूच्या बागा दिसतात. वाटेत एखाद्या मंदिरात थांबल्यावर येणारा शांततेचा अनुभव एरवीच्या धकाधकीत विरळाच. इथे जाण्यासाठीही लेह-लडाख प्रमाणेच एप्रिल ते आॅक्टोबरपर्यंतचा काळ योग्य आहे.