कल्याण-डोंबिवली परिवहनच्या बसमध्ये धुळधाण : प्रवासी हैराण
By अनिकेत घमंडी | Published: February 6, 2018 04:20 PM2018-02-06T16:20:46+5:302018-02-06T16:25:10+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने महापालिकेच्याच स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ या मोहिमेला हरताळ फासला आहे. परिवहनच्या बहुतांशी बसेस अस्वच्छ असून प्रवासी धुळीसह घाणीतून प्रवास करण्यास विरोध करत आहेत, पण रेल्वे मार्गाच्या उपनगरिय वाहतूकीत तुडुंब गर्दीमुळे आधीच पिचलेल्या प्रवाशांना पर्याय नसल्याने ते केडीएमटीच्या बसने प्रवास करत आहेत. आधीच केडीएमटी उत्पन्नामध्ये तोट्यात असतांना आता कमालीच्या अस्वच्छतेमुळे प्रवासी या सुविधेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने महापालिकेच्याच स्वच्छता सर्व्हेक्षण २०१८ या मोहिमेला हरताळ फासला आहे. परिवहनच्या बहुतांशी बसेस अस्वच्छ असून प्रवासी धुळीसह घाणीतून प्रवास करण्यास विरोध करत आहेत, पण रेल्वे मार्गाच्या उपनगरिय वाहतूकीत तुडुंब गर्दीमुळे आधीच पिचलेल्या प्रवाशांना पर्याय नसल्याने ते केडीएमटीच्या बसने प्रवास करत आहेत. आधीच केडीएमटी उत्पन्नामध्ये तोट्यात असतांना आता कमालीच्या अस्वच्छतेमुळे प्रवासी या सुविधेकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.
परिवहनच्या माध्यमातून प्रवास करतांना अनेकदा बे्रक जाम होणे, आईल- डिझेल, टायरची समस्या असणे यासह असंख्य समस्यांना प्रवााशांना सामोरे जावे लागते. असुविधांचे माहेरघर अशी परिवहन विभागाची ख्याती असतांना ती सुधारण्यासाठी कोणतेही विशेष प्रयत्न झालेले नसल्याने प्रवाशांमध्ये ही सुविधा असून नसल्यासारखी आहे. प्रचंड अस्वच्छता, घाण यामुळे प्रवास करायचा तरी कसा असा सवाल नित्याचे प्रवासी भुपेंद्र चौधरी यांनी केला. भुपेंद्र हे परिवहनच्या सेवेने डोंबिवली ते वाशी-सानपाडा असा प्रवास करतात. गेले अनेक महिने ते अस्वच्छतेमुळे हैराण असून त्यांना धुळीच्या त्रासामुळे श्वसनाचा त्रास झाला. ‘लोकमत’ने आढावा घेतला असता केवळ त्याच मार्गावर नव्हे तर निवासी विभाग, लोढा, मलंग, कल्याण शहरातील अनेक मार्गावर अशीच धुळीने माखलेल्या बसेस धावत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. आधीच या महापालिकेचा बकाल शहरांमध्ये अव्वल क्रमांक आलेला असून आता महापालिकेची परिवहन सुविधेतील बकालीमुळे अस्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
ते उत्पन्न गेले तरी कुठे?
'' परिवहनचे माजी सभापती शिवसेनेचे दिंडोरी संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरींनी परिवहनच्या उत्पन्नाचा आढावा घेतला असता ते जेव्हा सभापती होते तेव्हा प्रतीदिन ६.५ ते ७ लाखांची उलाढालीपर्यंत लक्ष्य गाठले होते, पण सुमारे आठ महिन्यांपासून जेमतेम ५ ते ५.५ लाखांची उलाढाल होत असल्याची माहिती चौधरींना मिळाली. त्यामुळे प्रतीदिन दीड-दोन लाखांची तूट परिवहनला भरुन तरी कशी काढणार? त्यामुळे प्रवाशांना सुखद-सुरक्षित आणि संरक्षित तसेच स्वच्छ प्रवास मिळत नसेल तर ते या सुविधेकडे पाठ फिरवणारच अशी नाराजीची प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त झाली. हे उत्पन्न नेमके गेले कुठे यासंदर्भात सत्ताधा-यांसह विरोधी पक्ष आळीमिळी गुपचिळीचे धोरण स्विकारत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.''
'' मिडि बसमुळे प्रवासी संख्या घटली, त्याचा परिणाम निश्चितच उलाढालीवर झाला. पण तरी आता नव्या १५ बस लवकरच सेवेत दाखल करत आहोत. अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून आगामी तीन दिवसात त्यासंदर्भात वॉशिंग मशिनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वच्छ प्रवास मिळेल - संजय पावशे, परिवहन सभापती.''
'' उत्पन्न खरे किती आहे ते दाखवा यावर किती वेळा भाष्य करायचे? जिथे शिवसेनेची सत्ता आहे तिथल्या सार्वजनिक सुविधांची बोंबच असल्याचे दिसून आले आहे. त्यापेक्षा इथली परिवहन सेवा बरखास्त करा आणि नवी मुंबई, ठाण्याच्या ताब्यात द्या. पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे - राजेश कदम, माजी परिवहन सभापती, मनसे''