जादुई रात्रींची दुबई एकदा अनुभवायलाच हवी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 06:00 PM2017-10-31T18:00:35+5:302017-10-31T18:07:49+5:30
जगातली नाइटलाइफसाठी जी मोजकी ठिकाणं प्रसिद्ध आहे त्यातलं एक म्हणजे दुबई. त्यामुळे दुबईमध्ये आल्यावर इथल्या जादुई रात्रीचा अनुभव घ्यायलाच हवा.
- अमृता कदम
दुबई हे जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षण आहे. या आकर्षणाचं कारण म्हणजे शॉपिंग आणि इथलं नाइटलाइफ. जगातली नाइटलाइफसाठी जी मोजकी ठिकाणं प्रसिद्ध आहे त्यातलं एक म्हणजे दुबई. त्यामुळे दुबईमध्ये आल्यावर इथल्या जादुई रात्रीचा अनुभव घ्यायलाच हवा.
नऊनंतर जागं होणारं दुबई
साधारण रात्री नऊ-साडेनऊनंतर ब-याचदा सामसूम व्हायला लागते. पण या शहरामध्ये रात्री नवीनच चैतन्य पाहायला मिळतं. मध्यरात्रीसुद्धा लोकं तुम्हाला आपल्या घरातून रस्त्यांवर बाहेरची मौज अनुभवण्यासाठी बाहेर पडल्याचं दिसतात.त्यामुळेच इथले बार आणि नाइटक्लब नेहमी हाऊसफुल्ल असतात. इथे अगदी हरप्रकारचे बार आणि नाइटक्लब उपलब्ध आहेत. जुनी दुबई आणि नव्या दुबईतल्या जुमेरा, अल बारशासारख्या काही ठिकाणी अत्यंत आरामदायी हॉटेल्स उपलब्ध आहेत. तुमचा पार्टीचा मूड असेल तर औद मीता, अल रिगा आणि अल करामा या परिसरात तुम्हाला पार्टीची सर्वांत जास्त ठिकाणं आढळतील.
पहाटे 3 वाजता बंद होतात इथले क्लब
इथल्या नाइटलाइफला रात्री बाराची डेडलाइन नाहीये. इथले क्लब पहाटे तीन वाजेपर्यंत सुरु असतात. मात्र तीन वाजल्यानंतर क्लब बंद करावेच लागतात. निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ क्लब चालू राहिला तर चालकाला भरभक्कम दंड भरावा लागतो. शिवाय दुबईमध्ये मद्यसेवनासाठी किमान 21 वर्षे वयाची अट आहे. जे बार किंवा हॉटेल्स यापेक्षा कमी वयाच्या तरु णांना मद्यपानाची सेवा देतात त्यांच्याविरोधात कारवाई केली जाते.
पण दुबईला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे रमझानच्या काळात तुम्ही दुबईच्या टूरवर जाणार असाल तर नाईट क्लब सुरु आहेत की नाहीत याची खात्री करा. कारण बहुतांश नाईटकल्ब हे या काळात बंद असतात.
नाईट क्लबची न्यारी दुनिया
दुबईतल्या अनेक नाइटक्लब, बार आणि रेस्टॉरण्टमध्ये तुम्हाला भारतीय लुक पाहायला मिळतो. विशेष करु न ‘बॉलिवूड बार’ आणि‘चिल रुफटॉप’ या क्लबचा परिसर अतिशय सुंदर आहे. तुम्हाला खास अरबी वातावरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर ‘डीरा क्लब’ ही योग्य जागा आहे. ‘अल जुमोरोफ’ हा अरबी नाईट क्लब तर ‘अल मुशिफक’ हा इराणी नाईट क्लबही इथे आहे. इथल्या ‘रॉयल मिराज’ हॉटेलमधला ‘कस्बा नाइट क्लब’ हा अत्यंत प्रसिद्ध आहे. हा मोरोक्को थीमवर आधारित क्लब आहे. दुबईतला सर्वांत मोठा क्लब म्हणूनही त्याची ख्याती आहे.
वाइनचे प्रसिध्द ब्रॅण्ड
दुबईमध्ये ‘वेस्ट इन हॉटेल’मधली ओनो वाईन बार ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी एकाहून एक सरस अशा वाईनचे ब्रॅण्डस टेस्ट करायला मिळतात. ‘बारस्टी बार’ हा समुद्र काठावर असलेला बार. इथून तुम्ही अगदी समुद्राच्या लाटांचा आनंद घेत वाइनची चव चाखू शकता. इथल्या मोठ्या स्क्र ीनवर अनेक लाइव्ह स्पोर्टस इव्हेण्टसही दाखवले जातात. वाइनसोबत या इव्हेण्ट्सचा आनंद घ्यायला इथे हजारोंनी लोक जमतात. डीजे म्युझिकच्या तालावर कॉकटेल आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत दोस्तमंडळींसोबत रात्रभर गप्पा मारण्याचा अनुभव तुम्हाला इथे मिळेल.
देशविदेशातल्या पर्यटकांचं आकर्षण
दुबईतले अनेक हॉटेल हे नाईट क्लब आणि नाइटलाइफसाठी प्रसिद्ध झालेत. या नाइटक्लबमध्ये जर्मन आणि इंग्रजी पबसोबतच रशियन डिस्कोचाही अनुभव तुम्ही घेऊ शकता. दुबईच्या खाडीजवळच एक एविएशन क्लबही आहे. उत्तम बिअरसाठी ही जागा प्रसिद्ध आहे. जुमेराह कॉम्प्लेक्स, अटलांटिस यासारख्या ठिकाणी काही हायटेक डिस्कोही आहेत. दुबई मरीना परिसरात जवळपास चाळीस वेगवेगळे बार आणि लाऊंज आहेत. देशविदेशातले पर्यटक इथे फिरण्यासाठी येत असतात.
दुबईसाठीच्या टूरिस्ट मॅन्युअल्समध्ये कदाचित तुम्हाला इथल्या नाइट-लाइफबद्दल फार माहिती मिळणार नाही. त्यामुळेच जर दुबईच्या जादुई रात्रींचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वत: त्याबद्दलची माहिती गोळा करा आणि त्यानुसारच दुबईची ट्रीप प्लॅन करा.