तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातील ७१ मौल्यवान नाणी गायब ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 06:10 PM2019-05-10T18:10:47+5:302019-05-10T18:17:42+5:30
हस्तांतरण करताना नाण्यांचा चार्ज पट्टीमध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सदरील नाणे गेले कुठे?
उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अनेक मौल्यवान वस्तुंचा समावेश आहे. या खजिन्याचे एका अधिकाऱ्यांकडून दुसऱ्याकडे हस्तांतरण करताना कायदेशीर बाबींचे उल्लंघन झाल्याची तक्रार अॅड. शिरीष कुलकर्णी व पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून खजिन्यातील वस्तूविषयींच्या संशयाचा फुगा गुरूवारी फोडला आहे.
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात साठा नोंद वही आहे. त्यामध्ये सर्व मौल्यवान वस्तुंची नोंद आहे. साठा नोंद वहीप्रमाणे जाणाऱ्या अधिकाऱ्याने कायदेशीर बाबींचे पालन करून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे चार्ज देणे बंधनकारक आहे. ही सर्व प्रक्रिया करीत असताना सोन्याचे किती वस्तू आहेत? चांदीसह अन्य मौल्यवान वस्तुंची संख्या किती? त्यांचे वर्णन कसे आहे? त्यांचे वजन किती आहे? याची सविस्तर माहिती लिखित स्वरूपात स्पष्ट करणे आवश्यक आहे.
पुरातन व मौल्यवान वस्तुंचा चार्ज देताना त्यातील तज्ज्ञांना बोलावणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. केवळ एका कागदावर मौल्यावान वस्तुंचे हस्तांतरण केले आहे. खजिन्यात अत्यंत दुर्लभ व दुर्मिळ ऐतिहासिक ७१ नाणी होती. अगदी विदेशी ते देशातील विविध संस्थांनानी त्या देवीला देवू केल्या होत्या़ या नाण्यांचा चार्ज पट्टीमध्ये कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे सदरील नाणे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित करीत अॅड. शिरीष कुलकर्णी व किशोर गंगणे यांनी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने साकडे घातले.
तक्रारी अर्जामध्ये उपस्थित केलेल्या मुद्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी चौकशीची ग्वाही दिली आहे. दरम्यान, यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी खजिन्याच्या चौकशीसाठी तीन अधिकाऱ्यांची एक समिती नेमली होती. या समितीला तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आजपावेतो या समितीला चौकशी करण्यास मुहूर्त गवसलेला नाही, असा दावा तक्रारदार कुलकर्णी व गंगणे यांनी केला आहे़