पैशासाठी जिल्हा बँकेत चकरा मारून गमावला जीव; संतप्त नातेवाईकांनी बँकेसमोर ठेवला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:51 PM2019-02-21T12:51:33+5:302019-02-21T13:16:47+5:30
बँकेकडून ठेवीची रक्कम दिली जात नसल्याने ते हताश झाले होते.
उस्मानाबाद : जिल्हा बँकेतील ठेवीच्या पैशासाठी वारंवार चकरा मारूनही हक्काची रक्कम मिळत नसल्यानेच सेवानिवृत्त बसचालकाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास मृतदेह जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवला.
उस्मानाबाद शहरातील गणेशनगर भागातील रहिवासी गुलाबराव वीरभद्र परशेट्टी (वय ६५) हे राज्य परिवहन महामंडळात बसचालक या पदावर कार्यरत होते. आयुष्यभर नोकरी करून पोटाला चिमटे घेत जमा केलेले सुमारे १६ लाख रूपये त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसह अन्य दोन शाखांमध्ये स्वत:च्या व पत्नीच्या नावे जमा केले होते. दरम्यान, रूग्णालयीन खर्च तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सदरील ठेव मिळावी म्हणून ते बँकेत चकरा मारीत होते. परंतु, बँकेकडून संपूर्ण रक्कम दिली जात नसल्याने ते हताश झाले होते. यातूनच हृदयविकाराचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी गुरूवारी सकाळी परशेट्टी यांचा मृतदेह जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारात ठेवला. अर्ध्या तासानंतर बँकेकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.