२०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:38 PM2018-06-28T23:38:46+5:302018-06-28T23:39:06+5:30
कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यानंतर गुरूवारी न.प. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून ५० हजार रुपये किंमतीचे कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्यानंतर गुरूवारी न.प. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून ५० हजार रुपये किंमतीचे कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले.
लक्ष्मी ट्रेडर्स या व्यावसायिक प्रतिष्ठानाच्या मालकाकडून यापूर्वी कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले आहे. सदर कारवाईदरम्यान पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यानंतर कुठल्याही परिस्थितीत कमी जाडीचे प्लास्टिक वापरात आणू नये, अशा सूचना दिल्या होत्या; पण सदर व्यावसायिकाकडून कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर केला जात असल्याची माहिती न.प. कर्मचाऱ्यांना मिळाली. यावरून न.प.च्या विशेष पथकाने लक्ष्मी ट्रेडर्सच्या मुख्य मार्गावरील गोदामावर छापा टाकून २०० किलो कमी जाडीचे प्लास्टिक व थर्माकोल जप्त केले. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्या उपस्थितीत अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, गुरूदेव हटवार, सतीश पडोळे, स्रेहा मेश्राम, गुणाडे, मानकर, कहाते, लोहवे आदींनी केली.