ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडून ३,६६९ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:34 AM2017-08-26T01:34:18+5:302017-08-26T01:34:32+5:30
धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो. नागरिकांच्या चांगुलपणाचा फायदा घेत फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातील अनेक तक्रारी ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाकडे पोहोचत असून जुलै अखेरपर्यंत ३ हजार ८३८ तक्रारी पैकी ३ हजार ६६९ तक्रारी निकाली निघाल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, २० लाखापर्यंतचे प्रकरण तक्रार निवारण न्याय मंचाच्या कार्यकक्षेत येतात. तर २० लाखांच्यावर आणि एक कोटी पर्यंतचे खटले राज्य आयोग तसेच एक कोटीच्या वरचे खटले राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकक्षेत येतात. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाला न्यायालयाचा दर्जा असून दोन्ही बाजुंचा युक्तीवाद लक्षात घेवून येथे प्रकरण निकाली काढले जाते. बँक, रेल्वे, विमा, टेलीकॉम, पोस्ट, बिल्डर्स व सोसायट्या, विद्युत वितरण, घरगुती साहित्य खरेदी, शिक्षण तसेच इतर स्वरुपाचे खटले ग्राहकांचे हित जोपासणे या उद्देशाला केंद्र स्थानिक ठेवून चालविले जातात. येथे दाखल झालेल्या खटल्याचा तिन महिन्यातच न्यायनिवाडा करुन प्रकरण निकाली काढली जात आहेत.
मंचाच्या स्थापनेपासून २०१७ च्या जुलै अखेरपर्यंत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात ३ हजार ८३८ खटले दाखल करण्यात आले. त्यापैकी ३ हजार ६६९ खटले निकाली काढण्यात आले आहेत. तर १६९ खटले प्रलंबित आहेत. मंचाकडे प्राप्त झालेले प्रकरण तीन महिन्यात निकाली निघत असल्याने सदर मंच ग्राहक हित जोपासण्यासाठी फायदाचा ठरत आहे.