भोसकून ५.६० लाख लुटले लुटारु स्कार्फ बांधून आले
By admin | Published: May 8, 2014 11:56 PM2014-05-08T23:56:47+5:302014-05-09T01:49:20+5:30
येथील भारतीय स्टेट बैंक शाखेतून ५ लाख ६० हजारांची रोकड काढून पुलगावला जात असताना चेहऱ्यावर स्कार्फ बांधून असलेल्या दोन अनोळखी इसमांनी चाकू हल्ला चढवून रक्कम लुटली.
सोरटा-विरूळ मार्गावरील थरार
वर्धा : विरूळ(आ.) येथील भारतीय स्टेट बैंक शाखेतून ५ लाख ६० हजारांची रोकड काढून पुलगावला जात असताना चेहर्यावर स्कार्फ बांधून असलेल्या दोन अनोळखी इसमांनी चाकू हल्ला चढवून रक्कम लुटली. हा थरार गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडला. चाकू हल्ल्यात हेमंत उर्फ गोलु देविदास जिचकार (४२) याच्या पायाला इजा झाली. पोलीस सूत्रानुसार, पुलगांवच्या शासकीय धान्य गोदाम परिसरातील रहिवाशी हेमंत उर्फ गोलु देविदास जिचकार हा विशाल धोपाडे याच्यासह दुचाकी क्रमांक एमएच ३२ एम ६२७२ ने बँकेतून रक्कम काढून पुलगावकडे येत होता. विरूळ (आकाजी) ते सोरटा मार्गावरील निजामपूर (टाकळी) फाटा परिसरात पुलगाव येथून आर्वीकडे स्कार्फ बांधून जाणार्या दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी या दोघांना अडविले.
एकाने विशालच्या गाडीची किल्ली काढून हेमंत जिचकारजवळ असलेली पैशाची बॅग हिसकावून पळण्याचा प्रयत्न त्या दोघांनी केला. यावेळी हेमंतने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर चाकू हल्ला चढविला. यात हेमंतच्या डाव्या पायावर चाकूची जखम झाली. हीच संधी साधून त्या लुटारुंनी त्याच्याजवळची काळ्या रंगाची पैशाची बॅग घेवून पोबारा केला. उल्लेखनीय, हेमंतने दुपारी १.१५ वाजता बैंकेतून पैसे काढले. यानंतर अवघ्या १५ मिनिटांत ही घटना घडल्याने हा नियोजित कट असण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी विरूळ स्टेट बैंकेच्या शाखेत जावून शाखा व्यवस्थापक प्रदीपकुमार दास तसेच रोखपाल जयकिशन बजाज यांना विचारणा केली असता हेमंतने सोरटा येथील शेती विकली. त्या रकमेचा धनादेश वटवून रक्कम घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. लुटारु चेहर्यावर स्कार्फ बांधून होते. एकाने काळा शर्ट घातला होता. घटनेची माहिती झाल्यानंतर जिल्ह्यात व जिल्हा सीमेवर नाकाबंदी करण्यात आली. या प्रकरणी रात्रीउशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.(प्रतिनिधी)