८० टक्के कापूस क्षेत्र अळीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:49 PM2017-11-27T22:49:29+5:302017-11-27T22:52:11+5:30
उच्च प्रतीच्या कापसाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात ८० टक्के कापसाचे क्षेत्र गुलाबी अळी, बोंडअळीच्या विळख्यात सापडले आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : उच्च प्रतीच्या कापसाच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात ८० टक्के कापसाचे क्षेत्र गुलाबी अळी, बोंडअळीच्या विळख्यात सापडले आहे. शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेले कपाशीचे पीक अळीमुळे पूर्णत: नष्ट झाले आहे. शेतकºयांनी कपाशी उपटून फेकण्यास सुरूवात केली असून शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. असे असताना राज्य सरकारची भूमिका बोटचेपीपणाची असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली असली तरी कंपन्यांवर अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. यामुळे शेतकरी आता न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. यासाठी शेतकऱ्यांचा सामूहिक लढा तयार होण्याची गरज आहे.
वर्धा जिल्ह्यात १ लाख ८५ हजार २११ हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे मुख्य पीक कपाशी आहे. दिवाळीनंतर कापूस निघण्यास सुरूवात झाली. अनेक भागात किडलेले बोंड व त्यातील खराब झालेला कापूसच शेतकऱ्यांना दिसून आला. गावातील अनेक हेक्टर क्षेत्रातील कपाशी पीक किडीने फस्त करून टाकले आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा, आंजी, तळेगाव, सिंदी (रे.), समुद्रपूर, देवळी तालुक्यातील अनेक गावांत शेतकरी किडीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झाले आहेत. बिटी बियाणे घेऊनही किड लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे कापसाचे पीक पूर्णत: नष्ट झाले आहे. राज्य शेतमाल मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी देवळी तालुक्याचा दौरा केला. कपाशी पिकाची पाहणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. खा. रामदास तडस यांनीही आंजी, देवळी भागात शेताची पाहणी करून याबाबत परिस्थिती जाणून घेतली. अनेक शेतकऱ्यांनी पोलिसांत कंपनी विरोधात फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्यात; पण कुठल्याही पोलीस ठाण्यात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सर्वत्र अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात येत आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सर्वत्र किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. शेतकºयांनी कपाशी पिकासाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकºयांवर आत्महत्येचे संकट ओढवल्याचे चित्र आहे.
कृषी विभाग उदासीन
शेतकरी स्वत: आपल्या शेतातील बोंड अळ्यांनी नष्ट केलेल्या कपाशीची झाडे सरकारी कार्यालयात व कृषी विभागाच्या कार्यालयात घेऊन येत आहेत. अधिकाऱ्यांना ते दाखवत आहे; पण अजूनही कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी कृषी सहायकांना आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत असले तरी कुठेही कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामे केलेले नाहीत. यामुळे बोंंडअळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांना शासनाची मदत मिळण्याची शक्यता नाही.
शेतकऱ्यांनी हे करायला हवे !
कपाशीचे पीक बोंडअळीमुळे हातून निघून गेले आहे. शेतीचा लागलेला खर्च वसूल होण्याची शक्यता नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी उपटून फेकण्यापूर्वी कृषी विभागाकडे लेखी स्वरूपात आपली वैयक्तिक तक्रार नोंदवून घ्यावी. त्याची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी. कृषी सहायकाला शेतात आणून त्याच्याकडून रितसर पंचनामे करून घ्यावे, त्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सह्या घ्याव्यात. त्याच्या प्रती आपल्या जवळ ठेवाव्या. गावातील जेवढ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांनी वैयक्तिक शेतांचे पंचनामे करून घ्यावे. हे सर्व कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल स्वरूपात संबंधित यंत्रणांकडून पोहोचल्याची खातरजमा करून घ्यावी. ज्यावेळी नुकसान भरपाईबाबत काही निर्णय केला जाईल, त्यावेळी शेतकºयाला किमान काही भरपाई तरी मिळू शकेल. या पंचनाम्याच्या अहवालावर न्यायालयात कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्याला जाता येईल. याबाबीची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्याच्या तक्रारीची कुणीही दखल घेणार नाही.
आकडा उपलब्ध नाही
मागील १५ दिवसांपासून कपाशीवर बोंडअळी, गुलाबी अळी असल्याची ओरड शेतकºयांतून होत आहे. याबाबत अनेकांनी तक्रारीही केल्यात; पण वेळेवर जाग येईल, तो शासकीय विभाग कसला. कृषी विभागालाही उशीरानेच जाग आली आहे. आज अळ्यांमुळे कपाशीचे किती क्षेत्र खराब झाले, अशी विचारणा केली असता सध्या आकडे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यामुळे किती क्षेत्र बाधित आहे, हे नेमके कळू शकले नाही.
बोंडअळीने कपाशी पीक धोक्यात
रसुलाबाद - एक महिन्यापूर्वीपासून कपाशीवर गुलाबी, लाल रंगाच्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. परिणामी, परिसरातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. शासनाने नुकसानग्रस्त कपाशी पिकांचे सर्वेक्षण करून सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
कृषी सहायक ए.ए. केंद्रे यांनी ठराविक शेतकऱ्यांची भेट घेत बोंडअळी नुकसानीबाबत अर्ज भरण्याची माहिती दिल्याचे काही शेतकरी सांगतात; पण अद्याप अनेक शेतकरी या माहितीपासून वंचित आहे. यामुळे योजना सर्वांसाठी नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा तलाठी साझा मोठा असून शेतकरी संख्या मोठी आहे. या गावासाठी कृषी सहायकाने आठवड्याचा एकच दिवस दिला आहे. यातही मोजक्याच शेतकऱ्यांच्या भेटी घेत निघून जातात. यामुळे इतरांना त्यांची वा योजनेची माहितीच मिळत नाही, अशी ओरड होत आहे. येथील शेतकरी प्रकाश वादाडे यांनी कापूस पिकावरील बोंडअळीबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. बियाणे कंपनी विरोधात कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून प्रशासनाकडे केली आहे.